Sadanand Kadam | डॉक्टरांचा आरामाचा सल्ला असताना रामदास कदम यांच्या भावाची दोन तासांपासून ईडी चौकशी
शिंदे गटाचे दिग्गज नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची गेल्या दोन तासांपासून ईडी चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे कदम यांच्या उजव्या खांद्यावरील गाठीची नुकतीच सर्जरी करण्यात आलीय.
मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam)यांची गेल्या काही तासांपासून ईडी चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सदानंद कदम यांची तब्येत बरी नाही. त्यांच्या उजव्या खांद्यावरील गाठीची नुकतीच सर्जरी झालीय. खेडच्या डॉ. उपेंद्र तलाठी यांनी त्यांच्यावर सर्जरी केलीय. या सर्जरीनंतर सदानंद यांना डॉक्टर तलाठी यांनी 24 मार्चपर्यंत बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिलाय. याबाबत सदानंद कदम यांनी ईडी अधिकाऱ्यांना सकाळीच माहिती दिलीय. विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टरांचे रिपोर्टही सादर केले. पण तरीही ईडी अधिकाऱ्यांनी आजच चौकशीचा आग्रह धरल्याची माहिती मिळत आहे.
सदानंद कदम यांनी आपली तब्येत बरी नसल्याने तसेच डॉक्टरांनी 24 मार्चपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला असल्याने आपली 23 मार्चनंतर चौकशी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. पण ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही. तुम्ही आजच चौकशीला या असा आग्रह ईडी अधिकाऱ्यांनी धरला. त्यामुळे सदानंद कदम यांना ईडी कार्यालयात यावं लागलं. सदानंद कदम हे त्यांच्या स्वत:च्या गाडीतून ईडी कार्यालयात चौकशीसाठी आले असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन तासांपासून त्यांनी ईडी अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे.
सदानंद कदम यांची ईडी चौकशी का?
सदानंद कदम हे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या बड्या नेताचा भाऊ असूनही सदानंद कदम यांची चौकशी कशी? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या दरम्यान सदानंद यांची नेमकी कोणत्या कारणास्तव चौकशी सुरु आहे याबाबतची माहिती आमच्या हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी ईडीकडून सदानंद कदम यांची चौकशी सुरु आहे. त्याचसाठी ईडीचं पथक आज सदानंद यांच्या गावी दाखल झालं आणि त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन गेलं.
ईडीचे पथक आज सकाळी दापोलीतल्या कुठेशी गावात दाखल झालेलं. ईडीचे अधिकारी आज सकाळी सर्च ऑपरेशनसाठी कुठेशी गावात दाखल झालेलं. त्यानंतर या पथकाने सदानंद कदम यांची भेट घेतली. या पथकाने सदानंद कदम यांना चौकशीसाठी ईडी कार्यालात बोलावलं. त्यानंतर कदम ईडी कार्यालयात आले आणि गेल्या दोन तासांपासून त्यांची ईडी चौकशी सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. साई रिसॉर्टचं खरेदी विक्री प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती, असा आरोप सोमय्यांचा आहे. याच प्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे.