संजय राऊत यांना मोठा झटका, सर्वात जवळच्या व्यक्तीशी संबंधित 10 ठिकाणी ईडीचे सर्च ऑपरेशन; कुणाच्या मुसक्या आवळणार?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी ईडीने धाडी मारल्या आहेत. या धाडीत मोठं घबाड ईडीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना धक्का देणारी बातमी आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीच्या घर आणि कार्यालयावर ईडीने सकाळी सकाळीच छापेमारी केली आहे. एकूण 10 ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी सुरू केली आहे. आधीच या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून केली जात असतानाच आता ईडीने त्यात उडी घेतल्याने या घोटाळ्यातील सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला दिलं होतं. पण त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला होता. हा तपास सुरू असतानाच ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर यांना दणका दिला. त्यानतंर आज ईडीने सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित 10 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या दहाही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. किती तास हे सर्च ऑपरेशन चालेल याची काहीच शाश्वती नाही. मात्र, या सर्च ऑपरेशनमध्ये ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.



मोठा बंदोबस्त
हे सर्च ऑपरेशन ज्या ठिकाणी सुरू आहे, तिथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कुणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत येण्यास मज्जाव केला आहे. फोन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. ईडीकडून प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ईडीने अचानक केलेल्या या छापेमारीमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही छापेमारी करण्यात आल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.
बडा डॉक्टर कोण?
या संपूर्ण घोटाळ्यात एक बडा डॉक्टर असल्याचंही सांगितलं जात आहे. या डॉक्टरने मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रुग्णालयामध्ये सेवा दिली आहे. त्याचंही नाव या घोटाळ्यात आलं आहे. मात्र, हा डॉक्टर कोण याची माहिती मिळू शकलेली नाही.
इतरही भागिदार
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी सुजीत पाटकर यांची आहे. त्यात डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे हे भागीदार आहेत. त्यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी नगर पुणे जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट हे फसवणूक करून मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.