अजून काय काय बाहेर येणार…रवींद्र वायकर प्रकरणात किरीट सोमय्यांचा इशारा
ed raid on shiv sena mla | शिवसेना गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी अमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. या छाप्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांनी कर नाही तर डर कशाला असे म्हटले आहे.
मुंबई, दि. 9 जानेवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापा टाकला आहे. रवींद्र वायकर यांची चौकशी सुरु होताच विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात तक्रार करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजून काय काय बाहेर येणार पाहा…’हिशाब तो देना पड़ेगा’…या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईडी ही स्वायत्त संस्था आहे. कर नाही तर डर कशाला, असे सांगितले.
काय म्हणाले किरीट सोमय्या
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे पार्टनर आहे. त्यांचे अलिबाग येथील १९ बंगले ठाकरे परिवार आणि वायकर यांचे ज्वाईंट प्रोजेक्ट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ५०० कोटींचे हॉटेलसाठी मुंबईचे मनपाचे आयुक्त इकबाल चाहल यांनी बेकायदेशीरित्या परवानगी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर परवानगी रद्द करण्यात आली. न्यायालयाने हा निर्णय योग्य ठरवला आहे. अजून या प्रकरणात काय काय बाहेर येणार पाहा. यासंदर्भात मला आश्चर्य वाटणार नाही. या लोकांनी नोटबंदीत काय काय दिवे लावले. ते सर्वांना माहीत आहे. ‘हिसाब तो देना पड़ेगा’
शंभूराज देसाई,कॅबिनेट मंत्री
ईडी स्वायत्त संस्था आहे. ईडीला या प्रकरणात काही मिळाले असेल त्यामुळे अधिक माहिती घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरु केली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा आज समोर आलेला नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. कारण नसताना ईडी कोणाची चौकशी करत नाही, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अपात्र संदर्भात जो विषय आहे,आम्ही सर्व गोष्टी नियमानुसार केले आहे,त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. रवींद्र वायकर यांच्यावर लगेच काही कारवाई नाही गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे.रवींद्र वायकर यांच्यावर झालेली कारवाई दबाव टाकण्यासाठी नाही, कायदेशीर भाग आहे, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. उद्याच्या सुनावणीची आम्हाला काहीही चिंता नाही, निकाल आमच्या बाजूने लागणार आहे. कारण बहुमत आमच्या बाजूने आहे, असे भुमरे यांनी सांगितले.