BMC अधिकाऱ्यांना घाम फुटला, ईडीकडून तब्बल 8 तास झाडाझडती, काय-काय घडलं?
ईडी अधिकाऱ्यांनी आज मुंबई महापालिकेत जावून तब्बल आठ तास तळ ठोकला. या आठ तासात त्यांनी अनेक कागदपत्रांची पडताळणी केली. अनेकांची चौकशी केली. विशेष म्हणजे संध्याकाळी 5 ते 6 वाजता कार्यालयाबाहेर पडणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयातच राहावं लागलं.
निखिल चव्हाण, Tv9 मराठी, मुंबई : महाराष्ट्रात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पावसाळा संपल्यानंतर लगेच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. असं असताना शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढवणाऱ्या घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. कोरोना काळात मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून अतिशय वेगाने कारवाई सुरु आहे. ईडीने गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
ईडीने काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी छापा टाकला. ईडीने तब्बल 17 तास त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. तसेच ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याही घरावर छापा टाकला. ईडीने काल दिवसभरात तब्बल 15 पेक्षा जास्त छापे टाकले. हेही असे की थोडे ईडी अधिकारी आज थेट मुंबई महापालिकेत दाखल झाले.
तब्बल आठ तास अधिकाऱ्यांची चौकशी
ईडी अधिकाऱ्यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी सुरु केली. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या खरेदी मध्यवर्ती विभागातील संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता सुटणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयातच थांबावं लागलं. या चौकशीमुळे अधिकारी आणि कर्मचारी यांना जास्तीचा वेळ कार्यालयातच थांबावं लागलं.
चार गठ्ठे आणि दोन बॅगा भरुन कागदपत्रे जप्त
मुंबई महानगरपालिकेच्या खरेदी मध्यवर्ती विभागाची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत ईडी अधिकाऱ्यांना महत्त्वाची कागदपत्रे हाती लागले आहेत. ईडीने तब्बल चार गठ्ठे आणि दोन बॅगा भरुन कागदपत्रे जप्त केले आहेत.
ईडीने स्वतःची झेरॉक्स मशीन मागवली
कोविड काळातील सर्व खरेदी देयके आणि कागदपत्रे यांची स्कॅनिंग करून त्यांची प्रत जमा करण्याचे काम सुरूच रात्री उशिरापर्यंत सुरुच होतं. सर्व पुरावे आणी कागदपत्रांची प्रत ईडीकडून जमा करण्यात आले. कागदपत्रे आणि पुरावे जमा करण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांनी स्वतःची झेरॉक्स मशीन मागवली. त्या कागदपत्रांमध्ये काही गैर आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे ईडीने महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची चौकशी केली. त्यामुळे अधिकारी वर्गातही धास्ती निर्माण झाली आहे. संजीय जयस्वाल यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचं मानलं जातं. पण त्यांचीदेखील यावेळी चौकशी करण्यात आली आहे. याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची या प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.