’60 लाखांची सोन्याची बिस्किटं, राजकीय वरदहस्त’, कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट
कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. ईडीने आपल्या आरोपपत्रात सुजीत पाटकरांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या प्रकरणावर किरीट सोमय्यांनी हिशोब तर द्यावाच लागेल, असं म्हटलंय.
मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने या प्रकरणी आरोपापत्रात मोठे दावे केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय. कोरोना संकट काळात राज्य सरकारकडून कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं. यापैकी वरळी आणि दहिसर कोविड सेंटरचं कंत्राट सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित लाईफलाईन कंपनीला देण्यात आलं होतं. या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय वस्तूंच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आधी करण्यात येत होता. त्यानंतर आता ईडीने आपल्या आरोपपत्रात धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुजीत पाटकर यांनी अधिकाऱ्यांना 60 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांची लाच दिली, असा आरोप कोविड घोटाळा प्रकरणात ईडीने केला आहे. कंत्राटाच्या मोबदल्यात सोन्याची बिस्किटं देण्यात आल्याचा उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. लाईफलाईन कंपनीने गौरमार्गाने 21 कोटी रुपये कमवल्याचा आरोपही ईडीने केला आहे. ईडीच्या या आरोपांमुळे सुजीत पाटकर आणि अनेक महापालिका अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ईडीच्या आरोपपत्रात नेमके आरोप काय?
ईडीने 15 सप्टेंबरला सुजीत पाटकर यांच्यासह हेमंत गुप्ता, संजय शाह आणि राजीव साळुंखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बिसुरे, डॉ. अरविंद सिंग, दहिसर जम्बो कोविड सेंटरचे डीन यांचाही समावेश आहे.
सुजीत पाटकरांना राजकीय वरदहस्तामुळे दहिसर आणि वरळी कोविड सेंटरचे 32.60 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. संजय शाह यांनी 60 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले. दागिने आणि पैसे पाटकरांच्यामार्फत पालिका अधिकारी आणि अन्य व्यक्तींना लाचेच्या स्वरुपात दिले.
सुजीत पाटकरांनी 15 लाख रुपयांची रक्कम महापालिका कर्मचार्यांनाही दिली. दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरेंनाही लॅपटॉपसह 20 लाखांची रोख रकमेसह मौल्यवान वस्तू मिळाल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे. लाईफलाईन कंपनीने गौरमार्गाने 21 कोटी रुपये कमावल्याचा ईडीचा आरोप आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
दरम्यान, ईडीच्या आरोपांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे. तसेच हिशोब तर द्यावाच लागणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. “संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना राजकीय पाठिंबा आणि वरदहस्त असल्यामुळे दहीसर आणि वरळी कोविड सेंटरचं कंत्राट मिळालं. ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे मोबदल्यात सोन्याची बिस्किटं, सोन्याची नाणी देण्यात आली. हिशोब तर द्यावाच लागणार”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.