मोठी बातमी! किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, अडचणी वाढणार?
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून एक मोठी बातमी समोर आलीय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. त्यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांनादेखील ईडीने समन्स बजावले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. तसेच ईडीने देखील किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी जाणार?
ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर तपास सुरु होता. याच प्रकरणी ईडीने किशोरी पेडणेकर यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. ईडीने त्यांना सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. दुसरीकडे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची याआधी गुन्हे शाखेकडून देखील चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना ईडी चौकशीला देखील सामारं जावं लागणार आहे.
दरम्यान, किशोरी पेडणेकर बुधवारी ईडी चौकशीला जातात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या ईडीच्या समन्समुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. किशोरी पेडणेकर या समन्सवर काय प्रतिक्रिया देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी खिचडी घोटाळ्याप्रकरणी अनेकांना ईडीने समन्स बजावले आहेत. काहींची चौकशीदेखील झालीय. त्यानंतर आता पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.