मुंबई : गेले तीन दिवस मुंबई आणि पुणे ईडीच्या कारवाईने हादरलं आहे. या तीन दिवसात ईडीने जवळपास 16 ते 17 ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीने ठाकरे गटाशी संबंधितांवर गळफास आवळला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाची कोंडी केली जात असल्याने आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे.
ईडीने गेल्या तीन दिवसात ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. पुण्यातही कोविड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आल्या आहेत.
किशोरी पेडणेकर महापौर असताना कोव्हिड घोटाळा झाला होता. कोव्हिड टेंडर प्रक्रियेत हा घोटाळा झाला होता. या प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली जाणार आहे. किशोरी पेडणेकर यांना लवकरच समन्स बजावून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी हे समन्स बजावलं जाणार असल्याचं वृत्त आहे. किशोरी पेडणेकर या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत. आक्रमक नेत्या आहेत. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं. मात्र, आता त्यांचीही चौकशी होणार असल्याचं वृत्त येऊन धडकल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, कोव्हिड घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करून घेणे याचा थेट संबंध स्थायी समितीशी येत असतो. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच तो सभागृहात येतो आणि सभागृहात महापौर तो प्रस्ताव मंजूर करत असतात. असं असताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? असा सवाल शिवसैनिकांमधून केला जात आहे. यशवंत जाधव हे केवळ शिंदे गटात असल्यामुळेच त्यांना अभय दिलं जात आहे काय? भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्या चौकशीची सुरुवात हे स्थायी समितीपासूनच झाली पाहिजे, असंही या शिवसैनिकांचं म्हणणं आहे.
ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे चव्हाण सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का? गेल्यास ते ईडीला काय उत्तरे देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील घरी ईडीने धाड मारली होती. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ही धाड मारली होती. साडे सोळा तास ईडीने चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली होती.