BIG BREAKING | जेवढे गेले त्यातील 80 टक्के आमदार परत येणार, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आता कार्यकर्ते जमू लागले आहेत. त्यामुळे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी भाजपसोबत जात सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांची 9 इतकी संख्या आहे. तसेच यामध्ये पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता या राजकीय घडामोडींवर पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. अजित पवार यांच्यासोबत जेवढे गेले आहेत त्यातील 80 टक्के आमदार परत येणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे. अनेक आमदार आज संध्याकाळपर्यंत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आता कार्यकर्ते जमू लागले आहेत. त्यामुळे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका नेमकी काय?
“राष्ट्रवादी काँग्रेसचे तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासोबतच आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला तो खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटसचा एक भाग होता. या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा नाही. ज्यांनी शपथ घेतली तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही. आम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्ष उभा करणार”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
‘मी खंबीर आहे’, शरद पवार यांची भूमिका
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.