मुंबई: जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. एकनाथ खडसे हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आले होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून शरद पवार आपल्या निवासस्थानी आराम करत आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांचे नेते शरद पवार यांना भेटून गेले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) बुधवारी सकाळी सिल्व्हर ओकवर आले आणि त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही याठिकाणी उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Eknath Khadse meet NCP cheif Sharad Pawar in Mumbai)
गेल्या दोन दिवसांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन आले आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तसेच मंगळवारी ते भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी मुक्ताईनगरच्या त्यांच्या घरी गेले होते.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस प्रथमच त्यांच्या घरी गेले होते. मात्र, यावेळी एकनाथ खडसे हे मुंबईत होते. देवेंद्र फडणवीस यांनी रक्षा खडसे यांच्या भेटीनंतर मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाची पाहणी केली. तसेच वादळ आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यापासून जळगाव भाजपमध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. अनेक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीचा निकालही भाजपच्या विरोधी गेला आहे. खडसे गेल्यानंतर पक्षाची होणारी पडझड थांबवण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड रोखण्यासाठी फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. फडणवीस यांनी या भेटीत पक्षाच्या बांधणीवरच रक्षा खडसे आणि महाजन यांच्याशी चर्चा केल्याने फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या:
‘…तर ते पवारांना ओळखतच नाहीत’, फडणवीस-पवार भेटीवर राऊतांचा रोखठोक अग्रलेख
एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले; जळगाव भाजपमधील पडझड थांबणार?
(Eknath Khadse meet NCP cheif Sharad Pawar in Mumbai)