‘गिरीश महाजन यांना माझ्या नावाचा कावीळ, दिवस-रात्र…’, एकनाथ खडसे यांची टोकाची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केलीय. महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झाला असल्याची टीका त्यांनी केलीय. त्यांच्या या टीकेवर आता महाजन काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई : येत्या दोन ते तीन दिवसात मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) आणि संबंधित व्यक्तींवर दूध फेडरेशन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार असल्याचं भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले. “गिरीश महाजन यांना माझ्या कावीळ झालाय. गिरीश महाजन यांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात”, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला. “दूध फेडरेशनमध्ये गैरव्यवहार असेल तर मी स्वतः या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ती तक्रार चोरी करणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या कालखंडातले एमडी जे कोणी असतील, पण राजकीय दबावापोटी त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही”, असा दावा खडसेंनी केला.
“याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद झाली नाही. मी रात्रभर त्या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण केलं. हायकोर्टाच्या माध्यमातून गैरव्यवहार करणाऱ्यांना मी दिलेल्या तक्रारीवरून नोटीस देखील बजविण्यात आली आहे. एकवेळ तो गुन्हा रजिस्ट झाला तर ही भानगड नेमकी कुणी केली आहे ते स्पष्ट होईल. या प्रकरणात फेडरेशनचे माजी संचालक जर दोषी असेल तर गिरीश महाजन यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत”, असादेखील दावा एकनाथ खडसे यांनी केला.
“मधले सहा महिने मोरे कारा हे चेअरमन होते. आमच्या मॅडम सात महिने रजेवर होत्या. त्या कालखंडात हा भ्रष्टाचार असल्याचं हे त्यांचं म्हणणं आहे. मुळात तो गैरव्यव्हार किंवा भ्रष्टाचार नाहीच आहे. एखादवेळेला अनियमितता असेलही, पण जी अनियमितता असेल ती एमडीच्या माध्यमातून झालेली असेल”, असं खडसे म्हणाले.
“जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. पण सातत्याने सत्तेचा माज येवून याच्यावर एफआयआर होईल त्याच्यावर एफआयआर होईल, पोलिसांवर दबाव आणायचा, खोटे गुन्हे दाखल करायचा हे उद्योग यांच्या माध्यमातून सुरु आहेत. पण त्याला आम्ही जुमाणनार नाही. दूध फेडरशनशी माझा काय संबंध? मी तूप, लोणी खाल्लंय का? माझ्यावर काय गुन्हा दाखल केलाय? फक्त राजकीय आकसापोटी त्यांना खडसे दिसतोय”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.