‘बच्चू कडूंनी तशी भूमिका घेऊ नये, अशा गोष्टींकरता कशाला संघर्ष?’; शिंदे-फडणवीसांचं आवाहन
"एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आम्ही राजकीय विरोधक आहोत. बच्चू कडू आमच्यासोबत होते. पण आता त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यामुळे अशाप्रकारची कुठलीही भूमिका घेऊ नये, ज्यामुळे राज्याचं नाव खराब होईल", असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
प्रहारचे आमदार बच्चू कडू सध्या प्रचंड आक्रमक झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रहार पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेची परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी 21 आणि 22 तारीख देण्यात आली होती. पण त्यांची सभा झाली नाही. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण प्रशासनाकडून बच्चू कडू यांच्या पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेला सायन्स कोर मैदानावर सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे बच्चू कडू आज सायन्स कोर मैदानावर दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यानंतर बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिय्या मांडला. बच्चू कडू यांना समजवण्याचा पोलिसांनी प्रचंड प्रयत्नही केले. पण बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“निवडणुकीत प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. पण वैयक्तिक किंवा असा संघर्ष होता कामा नये. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे. बच्चू कडू यांच्याशी मी स्वत: बोललोय. शेवटी आपण निवडणूक निवडणुकीच्या वातावरणात लढली पाहिजे. खेळाडू वृत्ती असली पाहिजे. संघर्ष होऊ नये. अमित शाह यांची सभा ठरली आहे. आम्ही देखील तिथे जाणार आहोत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मुख्यमंत्र्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आम्ही राजकीय विरोधक आहोत. बच्चू कडू आमच्यासोबत होते. पण आता त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यामुळे अशाप्रकारची कुठलीही भूमिका घेऊ नये, ज्यामुळे राज्याचं नाव खराब होईल. अमरावतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. त्यावेळेस आमच्या पक्षाने या मैदानाची परवानगी मागितली होती. आमच्या पक्षाला सांगितलं की, त्यांची सभा आहे. तर आम्ही सोडून दिलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मला राणांनी सांगितलं की, जो हॉल आहे, त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यांचं बुकिंग होतं. पण राष्ट्रीय नेते आले तर सोडून दिलं. निवडणूक आयोगाचे नियम आहेत की, मोठे नेते आले तर त्यांना प्राधान्य दिलं जातं. कारण ते नियम करण्याचं कारण असं आहे की, कुठलाही पक्ष चार-पाच दिवस बुकिंग करुन ठेवेल आणि दुसऱ्या पक्षाला जागाच देणार नाही. त्यामुळे बच्चू कडूंनी तशी भूमिका घेऊ नये. अशा गोष्टींकरता कशाला संघर्ष करायचा? बच्चू कडू यांनी समन्वयाची भूमिका घ्यावी. अमित शाह यांची सभा होऊ द्यावी, अशी आमची विनंती आहे. सभा होणार आहे, अमित शाह येणार आहेत, मी, एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यामुळे सभा होणार आहे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.