‘त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय?’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
"आम्ही लाडका भाऊ योजना केली ना? पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? म्हणून लाडका भाऊ देखील आम्ही घेतला. 10 हजार देतोय", असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री माझी बहीण योजनाची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार 21 ते 60 वयोगटाच्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. यावर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरुर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील काही आणा”, उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
“आमचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, बघिणी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्यामध्ये आले. आज अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अतिशय महत्त्वाची योजना आहे. आमच्या बहिणींच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार. त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असतो तो जेवण बनवायला गॅस. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
“तिसरी आमची योजना ही युवकांसाठी आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध हटवले. जवळपास 1 लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलोपमेंट आणि स्टार्टअपच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना या माध्यमातून लाखो तरुणांना योजना मिळाली. जर्मनीत चार लाख नोकऱ्यांच्या एमओयू झाला आहे. आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना 10 हजार अप्रेंटीशीप महिन्याला देणार आहोत. त्यांना कौशल्य मिळाल्यानंतर चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील. आम्ही लाडका भाऊ योजना केली ना? पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? म्हणून लाडका भाऊ देखील आम्ही घेतला. 10 हजार देतोय”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “मला नागपूरला जायचं असल्याने मी पहिले बोलायची संधी घेतली आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतीशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे. विशेषत: शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“उद्धव ठाकरे म्हणाले, थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही तर आपल्या माय-बापांचा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणाऱ्या, महिलांकरिता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आताच विरोधी पक्षाचे लोकं या ठिकाणी बोलत होते. आम्ही टीव्हीवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता. चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका करत होते. पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात एक नवीन इतिहास निर्माण करणार आहे म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार देणार आहेत. या अर्थसंकल्पात जे जे कबूल केलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या-त्या विविक्षित वेळेत आम्ही पूर्ण करुन दाखवू. हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.