महाराष्ट्रातील तब्बल दीड लाख तरुणांना नोकरी मिळणार, शिंदे-फडणवीस सरकारचं मोठं गिफ्ट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला हिंदुजा समूहाने प्रतिसाद देत ही गुंतवणूक केली असल्याचे हिंदुजा समूहाचे जी पी हिंदुजा आणि अशोक हिंदुजा यांनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्र सरकारचा हिंदुजा ग्रुपसोबत आज सामंजस्य करार झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हिंदुजा ग्रुपचे मुख्य जी पी हिंदुजा यांच्यासोबत आज बैठकीदरम्यान आज हा करार झाला. या करारानुसार हिंदुजा ग्रुप मुंबई आणि महाराष्टात एकूण 12 क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक तब्बल 35 हजार कोटी रुपयांची आहे. तर या गुंतवणुकीतून दीड लाख नागरिकांना रोजगार मिळणार आहे.
या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्टरिंग अशा विविध विभागांचा समावेश होणार आहे. याबद्दलची माहिती हिंदुजा समूहाचे मुख्य जी पी हिंदुजा यांनी दिलीय.
गेल्या महिन्यात लंडनमध्ये हाऊस ऑफ लॉर्डमध्ये एक गुंतवणूक विषयक सेमिनार झाला होता. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला हिंदुजा समूहाने प्रतिसाद देत ही गुंतवणूक केली असल्याचे हिंदुजा समूहाचे जी पी हिंदुजा आणि अशोक हिंदुजा यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हा सामंजस्य करार करण्यात आला.