Eknath Shinde | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक, एकनाथ शिंदे यांची मराठा समजाला कळकळीची विनंती

| Updated on: Oct 24, 2023 | 9:54 PM

मुख्यमंत्राी एकनाथ शिंदे आज दसरा मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात भर मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला अतिशय मोलाचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी मराठा तरुणांना महत्त्वाचं आवाहन केलं.

Eknath Shinde | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक, एकनाथ शिंदे यांची मराठा समजाला कळकळीची विनंती
Follow us on

मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला मराठा आरक्षण लागू करण्याबाबत मोठा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात दसरा मेळाव्याच्या जाहीर सभेत भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्षरश: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अक्षरश: नतमस्तक झाले. त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं.

“मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे. मला त्यांचं दु:ख, वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. जस्टीस शिंदे यांची कमिटी खूप काम करत आहे. आपण सुप्रीम कोर्टात क्युरिटीव्ह पिटीशन दाखल करुन घेतलं आहे. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही आरक्षण काढू न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणार. कारण सर्व समाजबांधव आपले आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे भर मंचावर भाषण सोडून शिवरायांच्या पुतळ्याकडे गेले आणि…

“मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मी तिथे जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर एकनाथ शिंदे भर व्यासपीठावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. तिथे त्यांनी शिवरायांना वंदन केलं. त्यानंतर पुन्हा व्यासपीठावर येवून भाषणाला सुरुवात केली.

“मी आपल्याला विनंती करतो, टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करु नका. आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. आपल्या मागे असलेल्या मुला-बाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. मला सांगा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्याचं काम आम्ही केलं. हायकोर्टात ते टिकलं, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही, त्याला जबाबदार कोण, ते योग्यवेळी मी बोलेन’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“माझी नम्न विनंती आहे, आपल्यासाठी सरकार आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध नाही. जातीजातीत मतभेद पसरुन राज्यात अशांतता पसरवण्याचं काही लोक काम करत आहेत. त्यांच्या हातात आपण आयतं कोलीत देणार का? म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. मला गोरगरीब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं नाही. राज्यातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.