Eknath Shinde : पत्रकार परिषदेने धाकधूक वाढवली, अखेर माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

| Updated on: Nov 27, 2024 | 4:11 PM

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार? याबाबतचा सस्पेन्स वाढला होता. अखेर त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली.

Eknath Shinde : पत्रकार परिषदेने धाकधूक वाढवली, अखेर माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड आज घडली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार? याबाबतचा सस्पेन्स वाढला होता. अखेर त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. “मी काल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना माझ्यामुळे किंवा कुणामुळे अडचण होईल, असं कधीही मनात आणू नका. तुम्ही आम्हाला अडीच वर्षे संधी दिली. तुम्ही महायुतीचे आणि एनडीएचे प्रमुख म्हणून निर्णय घ्या. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी जसा अंतिम असतो तसा आम्हालाही आहे. त्यामुळे माझी कोणतीही अडचण नाही. मी माझ्या भावना त्यांना सांगितल्या. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. तो निर्णय मला मान्य आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी यावेळी मांडली.

एकनाथ शिंदे नेमकं काय-काय म्हणाले?

“निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण भेटत आहोत. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो. आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली. त्याचं प्रतिबिंब पाहत आहोत. त्यात मी जात नाही. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चाललं. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात तसं मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केलं. मी त्या धारणेत होतो. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा येत नव्हता. त्यामुळे जनतेसाठी काही ना काही केलं पाहिजे असं वाटत होत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पाहा एकनाथ शिंदे लाईव्ह ऐका :