शिंदे गटाची मोठी खेळी, ठाकरे गटाच्या आमदारांच्या वाढू शकतात अडचणी, कारण…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. या निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे. या निकालातील काही मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई | 15 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडी आता पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरु असलेली कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हं आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. या निकालात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला आहे. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गटदेखील मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदर अपात्रतेच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यात यावे. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी व्हीप मान्य केला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र का केलं जाऊ नये? असा सवाल याचिकेत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
दुसरीकडे ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा आहे, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे की, शिंदे गटाच्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे, असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडून आल्या आहेत. या घडामोडींबाबत नागरिकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आगामी काळ महत्त्वाचा असणार आहे. कारण आगामी काळात याबाबत थेट जनताच फैसला करणार आहे. आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य जनता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान करते की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बहुमत देते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.