शिंदे गटाच्या खासदारांना लॉटरी लागण्याची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी संधी देणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
राज्य मंत्रिमंडळाबरोबरच, केंद्रातही मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. आणि हा विस्तार शिंदे गटासाठी फार महत्वाचा आहे. तर या विस्तारातून धक्कातंत्राचीही शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.
मुंबई : 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान शिंदेंच्या कॅबिनेटचा विस्तार अर्थात मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी दिली. विशेष म्हणजे आतापर्यंत काही टेक्निकल अडचणी होत्या, असंही शिरसाट म्हणालेत. पण फक्त राज्य मंत्रिमंडळाचाच विस्तार होणार असं नाही तर मोदींच्या कॅबिनेटचाही विस्तार होणार आहे. त्यामुळं केंद्रात शिंदे गटातल्या खासदारांनाही लॉटरी लागणार आहे. आता राज्याच्या कॅबिनेटचा विचार केला तर, शिंदे गटात मोठी कॉम्पिटिशन आहे.
संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, बच्चू कडू अधिक उत्सुक आहेत. बच्चू कडूंनी तर विस्ताराला उशीर होत असल्यानं आक्रमक प्रतिक्रिया दिलीय.
शिंदे सरकारला 6 महिने झालेत. पण सध्या 20 मंत्रीच राज्याचा कारभार पाहतायत. त्यामुळं रखडलेल्या विस्तारावरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही जोरदार समाचार घेतला.
हे झालं राज्य मंत्रिमंडळाचं. पण केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तारही याच महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे, ज्यात शिंदे गटाला 1 कॅबिनेट आणि 1 राज्य मंत्रिपद मिळू शकते. सध्या शिंदेंकडे 13 खासदार आहेत.
केंद्रातल्या विस्ताराच्या चर्चेवरुन संजय राऊतांनी राणेंवर निशाणा साधलाय. शिंदे गटाला सामावून घेण्यासाठी राणेंचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय.
शिंदेंनी भाजपशी हात मिळवल्यानं, शिंदे गटाला त्याचा फायदा केंद्रातही होणार आहे. आता केंद्रात शिंदे गटातल्या कोणत्या खासदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे कळेल.