Ajit Pawar | अजित पवार खरंच नाराज आहेत का? एकनाथ शिंदे म्हणाले…
अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने सुरु आहेत. असं असताना ते आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचं मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्यामागचं कारण सांगितलं.
मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय. अजित पवार हे गणेशोत्सकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बसलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बसलेल्या गणपती बाप्पाचं अनेक दिग्गजांनी दर्शन घेतलं होतं. देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी बसलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यामध्ये अनेक मोठे नेते, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, मोठमोठे सिनेकलाकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. पण अजित पवार हे गणेशोत्सवाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहेत. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नाहीत म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चांनंतर त्यांची पहिली भेट गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री झाली होती.
गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ही बैठक पार पडली होती. अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर ही पहिली बैठक होती. पण त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार अनुपस्थित होते.
अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित का?
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “अजित दादांची तब्येत आज ठीक नाहीय. त्यामुळे ते कॅबिनेटला आलेले नाहीत. त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणार?
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. “बिहारमध्ये जातनिहाय जनगणना जाहीर झालीय. तिथे ज्या काही प्रक्रिया सुरु आहेत, त्यावर चर्चा झालीय. त्याचे काय रिझल्ट येतात, त्यानंतर आपल्या राज्यात सुद्धा आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेतला जाईल”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“दुष्काळी भागातील कृष्णा नदीवरील प्रकल्पासाठी अनिल बाबर, महेश शिंदे, सुमनताई पाटील हे सातत्याने पाठपुरावे करत होते. मी संबंधित खात्याचे प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव दीपक कपूर यांना बोलावलं आणि तात्काळ निर्णय घेण्याची सूचना दिल्या. त्याप्रकारचा जीआर काढला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दुष्काळ संपेल. मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“नांदेडच्या घटनेला सरकारने गंभीरतेने घेतलं आहे. मी सकाळी अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. प्राथमिक माहिती घेतलीय. रुग्णालयात औषधांचा पूर्ण साठा होता. डॉक्टर आणि स्टाफ तिथे होता. पण जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास केला जाईल. आम्ही तिथे आमच्या मंत्र्यांना पाठवलं आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.