पैसे आहेत, सगळं आहे, अजित दादा आपल्या पाठिशी, चिंता करु नका : एकनाथ शिंदे
"उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे नवी मुंबईत स्वागत आहे. आता अजित पवार आपल्या पाठिशी आहेत. पैसे आहेत, सगळं आहे, चिंता करु नका", असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी मुंबई : “उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे नवी मुंबईत स्वागत आहे. आता अजित पवार आपल्या पाठिशी आहेत. पैसे आहेत, सगळं आहे, चिंता करु नका”, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीच्यावतीने आज (4 फेब्रुवारी) संध्याकाळी नवी मुंबईत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एकत्र कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात एकनाथ शिंदे बोलत होते.
या मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
“अनेक लोकांना वाटत होतं की, तीन पक्षाचं सरकार कसं बनेल? पण राज्यात आणि केंद्रात जी परिस्थिती होती त्यामुळे आम्ही एकत्र आलो. काही लोकांनी आमच्यावर शंका उपस्थित केली. महाविकास आघाडीचे १६२ आमदार नाहीत, असा दावा केला. तर काही लोकांनी आमचं सरकार पडावं म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र हे सरकार आज मजबूतीने सुरु आहे. याशिवाय काही लोकांनी १० रुपये जेवणावरुन टिंगल केली. पण आम्ही जेवण देऊन दाखवलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“एवढे कार्यकर्ते जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा इतरांचे डिपॉझिट जप्त करतील. ज्यांनी सेनेच्या पाठित खंजीर खुपसला त्यांचं काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. पवारसाहेबांना फसवणाऱ्यांना इथली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
“प्रत्येक वॉर्डीत एकच तिकीट असतं. पक्ष तीन आहेत, नवी मुंबईत एकाधिकारशाही मोडायची असेल तर आपल्याला नीट वागावं लागेल. ज्यांना तिकीट देणार त्यांना निवडून द्या”, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं.