महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरु? तुमच्या प्रश्नाचं A टू Z उत्तर, शिंदेंच्या शिलेदाराकडून सविस्तर खुलासा
"आमच्याकडून सांगण्यासारखी एक गोष्ट राहिली आहे, ज्या 6 मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा किंवा इतर कोणताही डाग नाही अशा मंत्रिपदाच्या नेत्यांनाच पुन्हा संधी द्यावी, असा विचार समोर आलेला आहे", अशी माहिती देत किरण पावसकर यांनी महायुतीमधील आतली बातमी सांगितली आहे.
महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला पार पडणार आहे. या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी गेले. यानंतर ते मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर एक प्रशासकीय बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजप नेते गिरीश महाजन हे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात अर्धा तास बैठक झाली. या बैठकीनंतर गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना कळवला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत शपथविधी, खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. या दरम्यान शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी महायुतीत काय-काय घडामोडी घडत आहेत? याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
“महायुतीत कुठेही नाराजी नव्हती. नाराजीचा कोणताही प्रश्न नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपणही बघितलं आहे. ते आज हॉस्पिटलमध्ये गेले होते. तुम्ही सुद्धा बघितलं आहे. त्यांची तब्येत खरोखर खराब होती म्हणूनच ते गावी गेले होते. त्यानंतर आज पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यामुळे कुठेही नाराजी नाही. नाराजीचा सूर नाही. पण काही गोष्टी अशा असतात की, त्यांची तब्येत खराब झाली म्हणजे कावळा बसायचा आणि फांदी तुटायची अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली. त्यांची कोणतीही नाराजी नाही”, असं किरण पावसकर यांनी स्पष्ट केलं.
सरकार स्थापनेबाबत पावसकर यांच्याकडून महत्त्वाची माहिती
“मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा ही भाजपचा गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कार्यवाही होईल. नियमानुसार, भाजपचा गटनेता निवडला जाईल. त्यानंतर कुणाला किती मंत्रिपदं देणार, कोणती खाती दिली जाणार याचा विचार केला जाणार आहे. भाजपची पक्षाची बैठक होऊद्या. भाजपचा गटनेताची निवड झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल”, असं किरण पावसकर यांनी सांगितलं. तसेच “कुणीही कोणत्या गोष्टीवर अडून बसलेलं नाही. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेत असतील तर कुणी कशाला अडून बसेल? त्यांनाही शेवटी जनतेला काहीना काही द्यायचंच आहे. नाहीतर केंद्राने आम्हाला एवढा निधी दिलाच नसता”, असंदेखील किरण पावसकर म्हणाले.
शिंदे-फडणवीस भेटीवर भाष्य
“ज्या महायुतीसाठी महाराष्ट्राच्या जनेतेने भरभरुन मतदान केलं आणि महायुतीला डोक्यावर घेतलं, त्याप्रमाणेच येणारा कार्यक्रमही तसाच महान होणार आहे. शिवसेना त्याचपद्धतीने त्यामध्ये उतरणार आहे. कुठल्याही मांगण्यासाठी सरकार स्थापनेचा मुद्दा अडकलेला नव्हता. गिरीश महाजन यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जावून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांनी आजही एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर दाखल होत भेट घेतली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत”, अशी प्रतिक्रिया किरण पावसकर यांनी दिली.
शिवसेनेचे 6 मंत्री शपथ घेणार?
“आमच्याकडून सांगण्यासारखी एक गोष्ट राहिली आहे, ज्या 6 मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा किंवा इतर कोणताही डाग नाही अशा मंत्रिपदाच्या नेत्यांनाच पुन्हा संधी द्यावी, असा विचार समोर आलेला आहे. जनतेला चांगले, अभ्यासू, काम करणारे, अनुभवी मंत्री मिळावेत, अशी अपेक्षा आहे. तसे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे कुठेही नाराजी नाहीत”, अशी महत्त्वाची माहिती किरण पावसकर यांनी दिली.
भाजप पक्षश्रेष्ठींनी महायुतीचे मंत्री ठरवले?
“तीनही पक्षांच्या नेत्यांना वाटतं की, आपले मंत्री हे खूप अनुभवी आणि चांगले काम केलेले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळावी. पण याचं मोजमाप हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी करणार आहेत. त्यांनी आपल्याकडून मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहेत. त्या प्रगती पुस्तकात त्यांनी केलेलं काम, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तिथलं केलेलं काम या सगळ्या गोष्टींचं मोजमाप होणार आहे”, अशी माहिती किरण पावसकर यांनी दिली.
“राजकारणात नंबर चालतात. ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांचा मुख्यमंत्री किंवा महापौर होतो हे नैसर्गिक आहे. त्यांच्याही आमदारांना हे वाटतच असेल ना? आमच्याकडे एवढे 132 आमदार आल्यानंतर आमचा मुख्यमंत्री का असू नये? एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे, खातं कोणतंही असूद्या, मला मुख्यमंत्रीही केलं, तरी मी सर्वसामान्य म्हणून लोकांमध्ये जाईन, लोकांचं काम करेन. आपण ज्या गेटवर आज उभे आहोत तो गेट आधी कुणासाठी उघडा नव्हता. त्यांनी मुख्यमंत्र्यांची एक नवी परंपरा सुरु केली आहे. त्यांची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे. त्यांनी कामांचा जो ठसा उमटवला आहे तो जनता कधी विसरणार नाही. राजकारणात वर जाणं आणि खाली जाणं सुरु असतंच”, अशी किरण पावसकर म्हणाले.