मुख्यमंत्र्यांनी भर मंचावर पंतप्रधान मोदी यांना आधी फोटो दाखवला, नंतर भाषणात किस्सा सांगितला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोबाईलवर फोटो दाखवत होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणावेळी मोदींविषयी एक किस्सा सांगितला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (19 जानेवारी) मुंबई (Mumbai) शहराच्या दौऱ्यावर आले होते. मुंबईतील वेगवेगळ्या विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुंबईच्या बीकेसी (BKC) मैदानात विविध विकासकामांचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना मंचावर एक वेगळा प्रकार बघायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोबाईलवर फोटो दाखवत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा शिंदे दाखवत असेलेले सर्व फोटो पाहिले. शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या यावेळच्या संभाषणाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणावेळी मोदींविषयी एक किस्सा सांगितला.
एकनाथ शिंदे यांनी नेमका काय किस्सा सांगितला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतं दावोस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना काय अनुभव आला याविषयी माहिती एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणावेळी दिली. यावेळी त्यांनी मोदी यांच्या विषयाचा एक अनुभव सांगितला.
“अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे मला दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा दिसला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मी जेव्हा दावोसमध्ये गेलो. तेव्हा मला जर्मनी, सौदी अशा अनेक देशांचे प्रमुख नेते म्हणायचे, तुम्ही मोदींसोबत आहात ना? तेव्हा मी त्यांना सांगायचो होय, आम्ही मोदींचीच माणसं आहोत”, असा किस्सा एकनाथ शिंदे यांनी सांगितला.
‘दावोस सारखा अनुभव सगळीकडे’, पंतप्रधान मोदी यांचं विधान
एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये आलेला अनुभव सांगितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्याबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. “एकनाथ शिंदे यांनी दावोसमधला आपला अनुभव व्यक्त केला. सगळीकडे तसाच अनुभव येतोय. भारताबद्दल सगळ्यांच्या मनात सकारात्मक भावना आहेत. भारताकडे आशेने पाहिलं जातंय. आज प्रत्येकाला वाटतंय की भारत ते करतोय जे विकासासाठी आणि समृद्धीसाठी खूप आवश्यक आहे. आज भारत अभूतपूर्व आत्मविश्वासाने भरलेला आहे”, असा दाना मोदींनी केला.