BREAKING : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच एकनाथ शिंदे स्मृतीस्थळावर का पोहोचले? वाचा Inside Story
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री आणि त्यांच्या समर्थक आमदारांसह आज रात्री शिवतीर्थीवावर दाखल झाले.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिवस आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री आणि त्यांच्या समर्थक आमदारांसह आज रात्री शिवतीर्थीवावर दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. पण बाळासाहेबांचा स्मृतीदिन हा उद्या असताना शिंदे गटाने आज त्यांच्या स्मृतीस्थळी दाखल होत अभिवादन का केलं? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय.
महाराष्ट्रात साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने हे सरकार पडलं. त्यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेचे थेट दोन गट पडले. एक म्हणजे ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याचं बघायला मिळालंय.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात ठाकरे-शिंदे गट यांच्यात हाणामारी झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यातही वाद झाल्याची माहिती समोर आली होती.
ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील वारंवार होणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जाऊन अभिवादन केलंय. कारण उद्धव ठाकरे उद्या स्मृतीदिनी अभिवादनासाठी येतील. त्यांच्यासह ठाकरे गटाचे सर्व नेते शिवतीर्थावर दाखल होतील.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेही स्मृतीस्थावर अभिवादनासाठी गेले तर शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या सर्व आमदारांसह आधीच बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलंय.
“बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दहावा स्मृतीदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांना अभिवादन करायला आलोय. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आठवणीशिवाय एक क्षणही जाणार नाही. ही वस्तूस्थीती आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दिली.