निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपालांकडे? राज्यातील राजकीय हालचालींना वेग
C. P. Radhakrishnan: राज्यपालांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या सदस्यांची यादी तसेच राजपत्राची प्रत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागले. दुसरीकडे राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. आता येणाऱ्या दोन दिवसांत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. राज्यातील निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. यामुळे महायुतीला दोन दिवसांत सरकार स्थापन करणे शक्य आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले. त्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना दिली. त्यामुळे आता राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊ शकणार आहे.
आयोगाने दिली राजपत्राची प्रत
भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईतील राजभवनावर जाऊन भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या सदस्यांची यादी तसेच राजपत्राची प्रत सादर केली.
निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झाले. या निकालानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाने २४ नोव्हेंबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द केली. या राजपत्र आणि अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाने राज्यपालांना दिली. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.
राज्यपालांकडे निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी पोहचल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करतील. त्यानंतर राज्यपाल बहुमत असलेल्या पक्षाला नवीन सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करणार आहे.