मुंबई : महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये राज्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण (Electric vehicle policy) जाहीर केले आहे. या धोरणानुसार दिनांक 1 जानेवारी 2022 पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना ते इलेक्ट्रीक वाहन असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. याची सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी झाली असून, राजशिष्टाचार विभागामध्ये इलेक्ट्रीक वाहने दाखल झाले आहेत. राजशिष्टाचार विभागांतर्गत राज्य शासनाच्या अतिथींसाठी एकूण सात वाहने घेण्यात येत असून, त्यातील दोन वाहने आज दाखल झाली आहेत. देशात प्रदूषण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. दिल्लीसह मुंबईमध्ये वायु प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाहनांमुळे निर्माण होणारा धूर हा प्रामुख्याने वायु प्रदूषणास जबाबदार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी ताफ्यांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी याबाबत घोषणा केली होती.
राजशिष्टाचार तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जीवाश्म इंधनावरून इलेक्ट्रीक वाहनांकडे संक्रमण करून या वाहनांचे औपचारिक स्वागत केले. स्वच्छ, हरीत ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रीक वाहनांच्या माध्यमातून इलेक्ट्रीक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी हे संक्रमण दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उर्वरित वाहने 26 जानेवारी रोजी ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पर्यावरण व वातावरणीय बदल, पर्यटन तसेच राजशिष्टाचार विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण विभागाने वातावरणीय बदल रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण हा त्याचाच एक भाग असून याची सुरूवात सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश करून यापूर्वीच करण्यात आली आहे. आता राज्य शासन आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालयात 1 जानेवारी 2022 पासून खरेदी करण्यात येणारी नवीन वाहने ही इलेक्ट्रीक वाहने असावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. राजशिष्टाचार विभागाने याची सुरूवात करून पहिले पाऊल टाकले आहे.
Weather: नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका, औरंगाबादेतही अवकाळी, मराठवाड्यात गारठा वाढणार?
अजितदादांवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवा, भाजपाच्या आमदाराची मागणी!
VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?