इनकमिंग, आऊट गोइंग सुरूच… माजी नगरसेवकाची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी, तर माजी खासदाराने बांधलं शिवबंधन
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी खासदाराने पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गटाचे बळ वाढलं आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील गळती सुरूच होती. काही अपवाद वगळता ठाकरे गटात कोणताही मोठा प्रवेश झाला नाही. त्यामुळे ठाकरे गटात काहीसे निराशेचं वातावरण होतं. मातोश्रीवरही मोठ्या पक्षप्रवेशाची गर्दी दिसली नाही. मात्र, आज मातोश्रीवरील चित्रं वेगळं होतं. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… च्या घोषणांचा पाऊस पडत होता. निमित्त होतं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशाचं. भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज हातात शिवबंधन बांधलं. ठाकरे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर संगमनेर, शिर्डी आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या कार्यकर्त्यांकडून मातोश्री बाहेरच घोषणाबाजीला सुरुवात झाली होती. जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला… आणि उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है… आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मूळचे शिवसैनिक असलेले पण भाजपमधून निवडणूक लढवलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले. यावेळी वाकचौरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उत्साहाचे वातावरण होतं.
ठाकरे गटाला बळ मिळणार
भाऊसाहेब वाकचौरे हे माजी खासदार आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानंतर वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत वाकचौरे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.
मध्यंतरी ते भाजपमध्येही गेले होते. दरम्यान, वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची शिर्डी आणि अहमद नगरमधील ताकद वाढणार आहे. नगर जिल्ह्यात ठाकरे गटाला बळ मिळणार आहे. तसेच ठाकरे गटाला वाकचौरे यांच्या निमित्ताने लोकसभेसाठी एक बलाढ्या नेताही मिळाला आहे.
माजी नगरसेवकाची सोडचिठ्ठी
दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. सुभाष कांता सावंत हे विलेपार्लेतील माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना शाखा क्रमांक 83 चे शाखाप्रमुख नरेश सावंत, महाराष्ट्र नाथयोगी सेवा समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष भावेश राजपूत, शाखा क्रमांक 82 चे उपशाखाप्रमुख राजाराम यादव, शिव वाहतूक सेनेचे सचिव कल्पेश बालघरे आणि शिव वाहतूक सेनेचे उत्तर मुंबई लोकसभा संघटक मुस्तकिम शेख यांनीही शिंदे गटात प्रवेश केला