ओबीसींच्या प्रश्नावर भाजपात पुन्हा एकदा ‘शेरनी’ ठरतील का पंकजा मुंडे?; वाचा सविस्तर
ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी भाजपने राज्यव्यापी चक्काजामची हाक दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (maharashtra politics)
मुंबई: ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी भाजपने राज्यव्यापी चक्काजामची हाक दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे पक्षात अडगळीत गेल्या सारख्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा आपली स्पेस निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्या पुन्हा एकदा भाजपमध्ये ‘शेरनी’ ठरणार का? याचा घेतलेला हा आढावा. (Explained: will pankaja munde come back in maharashtra politics?)
आज पुण्यात बैठक
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी पंकजा मुंडे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. यावेळी त्या पुणे शहर व ग्रामीण व पिंपरी चिंचवडच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधीच्या समवेत बैठक घेणार आहेत. सकाळी भारतमाता अभ्यासिका पर्वती येथे तर दुपारी 3.30 वाजता हॉटेल कलासागर, कासारवाडी येथे पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवडची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची तयारी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ओबीसींना वळवण्याचा भाजपचा प्रयत्न
2019मध्ये भाजपने एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्यांची तिकिटं कापली. त्यामुळे ओबीसी समाज भाजपवर नाराज होता. त्याचा फटका पहिल्यांदा नागपूरमध्ये पदवीधरांच्या निवडणुकीत भाजपला बसला. ओबीसी घटक भाजपपासून दुरावला होता. हे त्याचं मुख्य कारण होतं. त्यामुळे ओबीसींना जवळ आणण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी हा भाजपचा कोअर आहे. विदर्भातील यशात ओबीसींचा मोठा वाटा होता. त्यामुळे हा समाज पुन्हा भाजपकडे वळवायचा असेल तर ओबीसी नेत्यांना पुढे केलं पाहिजे हे भाजपच्याही लक्षात आलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात या निमित्ताने ओबीसी नेत्यांना पुन्हा सेंट्रल स्टेजला आणण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे मजबुरी
ओबीसी नेत्यांना बाजूला करण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले आहेत. पंकजा मुंडे या स्पर्धक असल्या तरी त्यामुळे पक्षाची वाताहत करता येत नाही. दुसरा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून सत्ता घालवणे भाजपला परवडणारे नाही. खुर्ची तोडणाऱ्यांपेक्षा खूर्ची ओढणारे परवडले, या अनुषंगाने भाजपची वाटचाल असेल. सध्यातरी पंकजा मुंडे या भाजपची मजबुरी आहेत. कारण ओबीसी नेतृत्वाला प्राधान्य द्यावचं लागेल. हा दुखावलेला आणि दुरावलेला घटक पुन्हा वळवायचा असेल तर त्यांना जवळ करावच लागेल. पंकजा मुंडेंना केंद्रीय कार्यकारिणीत पाठवणं ही तात्पुरती सोय होती. इथे वाद नको म्हणून तो निर्णय झाला होता. पंकजा यांनाही महाराष्ट्रातच रस आहे. त्यांचा उपयोगही महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढा होईल तेवढा राष्ट्रीय पातळीवर होणार नाही. सत्ता आली तर त्या स्पर्धक ठरतील, विरोधी पक्षात कसली आलीय स्पर्धा?, असा सवालही अभय देशपांडे यांनी केला.
भाजप पंकजांना कसे प्रोजेक्ट करणार त्यावर अवलंबून
पंकजा मुंडेंना ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मिळाला आहे. त्यात त्यांना नेतृत्व करण्याची किती संधी मिळते? तसेच या प्रश्नावर पक्षातून किती सपोर्ट मिळतो किंवा त्यांना कसं प्रोजेक्ट करतात त्यावर बरंच आवलंबून आहे. त्या केंद्रीय कार्यकारिणीत होत्या. पण तिथे त्यांचा काहीच ठसा उमटला नाही. त्यामुळे त्या पक्षातून साईडलाईन झाल्या होत्या यात शंका नाही, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलं. पंकजा यांनी औरंगाबादेत पाणी प्रश्नावर आंदोलन केलं. त्यानंतरही त्यांना जसा वाव द्यायला हवा होता तसा मिळाला नाही. केंद्रात गेल्याने त्यांना वाव मिळाला नाही. त्यानंतर त्यांना राज्यातील आंदोलनात स्थान दिलं गेलं नाही. गोपीचंद पडळकर. चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, राम कदम, प्रवीण दरेकरांना जेवढा वाव दिला जातो, तेवढा त्यांना दिला जाईल असं वाटत नाही, असं हेमंत देसाई म्हणाले.
एकामर्यादे पर्यंत वाव मिळणार नाही
ओबीसी ही भाजपची व्होट बँक असली तरी गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वात भाजपने ओबीसींचा बेस वाढवला आहे. देशात ओबीसींचा म्हणून कोणताही पक्ष नाही. ओबीसींची व्होटबँक वापरणारा एकही नेता नाही. पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांनी ओबीसींचे प्रश्न अभ्यासूपणे मांडले ते लावून धरले असंही कधी झालं नाही. गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा यांनी ते प्रश्न लावून धरले नाही. तसं दिसलं नाही. ओबीसींचे मेळावे, मोर्चे आणि आंदोलन घ्यायची असेल तर पक्षाची परवानगी लागते. त्यावेळी पंकजा यांना किती वाव दिला जाईल याबद्दल खात्रीशीर काहीच सांगता येत नाही. परंतु, जोपर्यंत फडणवीस आहेत, तोपर्यंत एका मर्यादे पलिकडे पंकजा मुंडेंना मोठं होऊ दिलं जाईल असं वाटत नाही, असंही हेमंत देसाई यांनी स्पष्ट केलं.
पंकजा कमबॅक करतील
ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांचं कमबॅक होईल. मधल्या काळात भाजपने अनेक आंदोलने केली. पण ही आंदोलने चित्रा वाघ आणि इतर नेत्यांनी कॅश केली होती. बीडमध्येही त्यांचा बेस कमी झाला आहे. त्यामुळे ओबीसींचा हा मुद्दा कॅश करण्याचा पंकजा यांचा प्रयत्न राहील, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये यूज अँड थ्रो होणार नाही. त्या मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यामुळे त्याची जाणीव ठेवूनच त्या पुढे जातील, असं औरंगाबादचे ‘लोकमत’चे उपसंपादक राम शिनगारे यांनी सांगितलं. (Explained: will pankaja munde come back in maharashtra politics?)
उद्या 20 जून रोजी पुणे शहर व ग्रामीण व पिंपरी चिंचवडच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी च्या समवेत बैठक घेण्यासाठी मी पुणे येथे येणार आहे. सकाळी 10.30 वा. भारतमाता अभ्यासिका पर्वती येथे तर दुपारी 3.30 वा. हॉटेल कलासागर, कासारवाडी येथे पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवडची बैठक घेणार आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 19, 2021
संबंधित बातम्या:
जे मुख्यमंत्र्यांना जमले ते अजित पवारांना का नाही? आधी ‘ग्यान’ दिले, नंतर त्यालाच हरताळ?
‘ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात’
(Explained: will pankaja munde come back in maharashtra politics?)