सावधान! म्युकरमायकोसिस शरीरात पसरला, मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले
Black Fungus Mucormycosis |पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.
मुंबई: राज्यात म्युकरमायकोसिसच्या आजाराचे संकट किती धोकादायक ठरू शकते याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या वयोगटातील लोकांपुरता मर्यादित असलेल्या म्युकरमायकोसिसने (Mucormycosis) आता लहान मुलांनाही कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत म्युकरसमायकोसिसमुळे नुकतीच तीन लहान मुलांचे डोळे काढण्याची वेळ ओढावली. (Black Fungus Eyes of 3 children infected with Mucormycosis removed in Mumbai)
प्राथमिक माहितीनुसार, या तिन्ही मुलांचे वय अनुक्रमे चार, सहा आणि 14 इतके होते. या तिघांच्या शरीरात म्युकरमायकोसिसचा फैलाव झाल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले. या तिघांपैकी केवळ 14 वर्षांच्या मुलाला मधुमेहाचा त्रास होता. तर मुंबईत उपचार घेत असलेल्या आणखी एका 16 वर्षांच्या मुलाला कोविडमधून बरे झाल्यानंतर मधुमेहाची व्याधी जडल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मुंबईतील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हा अत्यंत वेगाने शरीरात पसरतो. अशातच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जीव वाचवण्यासाठी डोळे काढण्याची वेळ
16 वर्षांच्या मुलीला कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला अगोदरपासून मधूमेह नव्हता. मात्र, वैद्यकीय तपासणीत तिच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून आले. तिच्या आतड्यात रक्तस्राव होत होता. अँजिओग्राफी केल्यानंतर या मुलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
तर चार आणि सहा वर्षांच्या मुलांनाही म्युकरमायकोसिसची बाधा होऊन त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर या मुलांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना नाईलाजाने त्यांचे डोळे काढण्याचा निर्णय घ्यावा लागला.
राज्यात पुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट?
महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे.
तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात 10 टक्के रुग्ण लहान मुलं आणि तरुण असतील असंही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.
संबंधित बातम्या:
नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती
(Black Fungus Eyes of 3 children infected with Mucormycosis removed in Mumbai)