फडणवीस, फडणवीस, फडणवीस खूप झालं, भास्कर जाधव असं का म्हणालेत
त्यामुळं त्यांनी समर्थन केलं की नाही, हे तुम्ही ठरवा, असंही भास्कर जाधव म्हणाले.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भास्कर जाधव म्हणाले, सध्या फडणवीस, फडणवीस, फडणवीस खूप झालेलं आहे. मला काही त्यांच्याबद्दल द्वेष नाही. परंतु, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कानाखाली मारीन असं म्हटलं होतं. त्यावेळी फडणवीस काय म्हणाले,नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण, पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
कंगना राणावत या शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाल्या, आम्ही त्यांचं समर्थन करत नाही. पण, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. राज्यपालांनी लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज, महाराष्ट्र यांचा अपमान केला. तेव्हा फडणवीस काय म्हणाले, आम्ही त्यांच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण, आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत.
त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत. परंतु, महिलांच्या बाबतीत समर्थन करत नाही, हे सांगितलं. दुसरीकडं खोके खोके बोलू नका हे सांगितलं. त्यामुळं त्यांनी समर्थन केलं की नाही, हे तुम्ही ठरवा, असंही भास्कर जाधव म्हणाले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही चांगली मजल मारली. आता येणाऱ्या निवडणुकीतही निखळ यश आमचं असेल, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
कोर्टाचे ईडीवरील ताशेरे केंद्राच्या प्रवृत्तीवरील ताशेरे असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. कोर्ट म्हणाले, संजय राऊत यांचा या घटनेशी दुरान्वयानंही संबंध नाही. प्रवीण राऊत यांच्यावर दिवाणी स्वरुपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
परंतु, राकेश वाधवा यांना पत्राचाळ प्रकरणी खऱ्या अर्थानं जबाबदार धरलं पाहिजे होतं. ते मोकाट सुटलेत. पण, ज्यांचा संबंध नव्हता, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. तत्परता कुठं दाखविता, असंही भास्कर जाधव यांनी ईडीला सुनावले. या सर्व प्रकारामुळं संजय राऊत यांना, त्यांच्या कुटुंबीयांना, ठाकरे गटाला मानसिक त्रास झाला.