मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक
Nawab Malik | पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांचा साठा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी बनावट नोटा सापडत होत्या. मात्र, महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
मुंबई: देशभरात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांचा साठा नष्ट करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी बनावट नोटा सापडत होत्या. मात्र, महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभर एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत. कारण, या सगळ्या रॅकेटला देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
नवाब मलिक बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारी विश्वातील अनेक लोकांशी संबंध असल्याचा आरोप केला. नोटाबंदीच्या जवळपास एका वर्षानंतर 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईच्या बीकेसी परिसरात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा पकडण्यात आला होता. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. त्यावेळी केवळ 8 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील लोकांना काही दिवसांतच जामीन मिळाले होते. तेव्हा हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे का सोपवण्यात आले नाही? या नोटा नक्की कुठून आल्या, याचा शोध का घेण्यात आला नाही, असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले.
‘देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांना महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवले’
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी असताना गुन्हेगारांना सरकारी आयोग आणि महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. मुन्ना यादव हा नागपूरातील कुख्यात गुंड आहे. मात्र, फडणवीस यांनी त्यांना बांधकाम महामंडळाचे अध्यक्षपद दिले. बांगलादेशी नागरिकांना भारतात वसवण्याचे काम करणाऱ्या हैदर आझमला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. हैदर आजम बांगलादेशींना साथ देतो. त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. मालाड पोलीस त्याची चौकशी करत आहे. बंगाल पोलिसांनी कागदपत्रं खोटे आहेत असं सांगितलं. तुमच्या कार्यालयातून पोलिसांना फोन गेला. ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?
अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. त्याला जामीन कसा मिळाला? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली.
संबंधित बातम्या:
1993 बॉम्बस्फोट कनेक्शन, फडणवीसांनी उल्लेख केलेला सरदार शाह वली खान कोण आहे?