व्यवसायात तोटा झाल्याने मुंबईतील प्रसिद्ध हिरे व्यापाराचं टोकाचं पाऊल, भर समुद्रात उडी मारून संपवलं जीवन
एका हिरे व्यापाऱ्याने गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai Suicide Case : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी सी-लिंकवरुन एका व्यापाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर एका तरुणीने मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता रविवारी 21 जुलै रोजी एका हिरे व्यापाऱ्याने गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात उडी मारुन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. व्यवसायात तोटा झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका हिरे व्यापाऱ्याने गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. संजय शहा (65) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. संजय हा हिरे व्यापारी होता. व्यवसायात तोटा झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पण अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. तसेच या घटनेनंतर खबरदारी म्हणून पोलिसांकडून आज मरीन ड्राईव्ह परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही दिवसांपासून वारंवार आत्महत्या होत असल्याने पोलिसांकडून या परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे.
वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन उडी मारुन केली आत्महत्या
दरम्यान काही दिवसांपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील वरळी सी-लिंकवरुन एका व्यापाराने उडी मारुन आत्महत्या केली होती. भावेश सेठ असे या व्यावसायिकाचे नाव होते. त्याने आत्महत्येपूर्वी मुलाला फोन करुन आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, भावेश सेठ यांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवर आपली कार थांबवली. यानंतर समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी भावेश सेठ यांनी मुलाला फोनही केला होता. पोलिसांना त्यांच्या गाडीत सुसाइड नोटही मिळाली होती.
15 जुलैला 23 वर्षीय तरुणीची आत्महत्या
वांद्रे-वरळी सी-लिंकवरील आत्महत्येच्या घटनेपूर्वी दोन दिवस आधी मरीन ड्राइव्ह येथे एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना 15 जुलैला घडली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी मृत ममता कदम तरुणीने समुद्रात उडी मारत आपला जीव दिला होता.
या तरुणीने समुद्रात उडी मारण्याआधी आपली बॅग बाहेरच ठेवली. बॅगमध्ये मिळालेल्या ओखळपत्रावरुन तिची ओळख पटवण्यात आली. मृत ममताचे वय 23 वर्ष असल्याचे बोललं जात आहे. ती एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. ममता आत्महत्या करण्याच्या दिवशी घरी कामावर जात असल्याचे सांगत घराबाहेर पडली होती. पण ती कामावर न जाता मरीन ड्राईव्ह परिसरात आली. ममताने वैयक्तिक कारणामुळे आपले जीवन संपवले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.