कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांनी घेरलं, थेट विचारला जाब, पाहा VIDEO
यवतमाळमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्यांना चारही बाजूने घेरलं. यावेळी काही काळ गोंधळलेली परिस्थिती बघायला मिळाली. शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांचं आक्रमक रुप बघून अखेर धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यावी लागली.
मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी घेरलं. यवमाळमधील शेतकरी आत्महत्येच्या घटनांवरुन या शेतकऱ्यांनी थेट कृषीमंत्र्यांना जाब विचारला. यावेळी गोंधळ होताना बघायला मिळाला. पण शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी कृषीमंत्र्यांना घेरलं. यवतमाळमधील शेतकरी आत्महत्येच्या घटनेवर ठोस उपाययोजना करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली. शेतकरी यावेळी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. गेल्या 17 दिवसांत 17 आत्महत्या झाल्या, असं शेतकऱ्यांनी यावेळी कृषीमंत्र्यांना सांगितलं. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कृषीमंत्र्यांनी लवकरच बैठक घेऊ, असं आश्वासन दिलं.
कृषीमंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये नेमकं संभाषण काय?
शेतकरी मनिष जाधव : धनुभाऊ आठ महिने झाले. यवतमाळ जिल्ह्यात 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तुम्ही आमच्या प्रश्नाला उत्तर देऊन जा.
धनंजय मुंडे : एक मिनिट… आवाज… नीट बोला
मनिष जाधव : तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात येवून शेतकऱ्याला धमकावणार का आता? दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमचा चेबाट जमिनी संदर्भात प्रश्न आहे. दामले सर आहेत. मी मनिष जाधव. शासन सन्मानित शेतकरी आहे.
धनंजय मुंडे : आपण शेतकरी आहात. मीही शेतकरी आहे. आपण जरा हळू आवाजात बोला. तुमच्या ज्या भावना आहेत…
मनिष जाधव : ज्या व्यक्तीच्या पदस्पर्शाने महाराष्ट्राची मातृभूमी पुण्यवान झाली अशा कैलासवासी वसंतराव नाईक यांचा यवतमाळ जिल्हा आहे. गेल्या 17 दिवसांत 17 आत्महत्या झाल्या आहेत. क्राईम रेकॉर्ड आहे. आठ महिन्यामध्ये 160 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्याला विशेष दर्जा देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे.
शेतकरी दामले : आपल्या इथे जलसंधारण राबवणं शक्य नाहीय. यवतमाळ जिल्ह्याच्या 5 तालुक्यामध्ये जलसंधारणासाठी 1 चौरसफुटही क्षेत्र नाहीय. आपल्याला जिमिनीतून पाणी निचरा करण्यासाठी सिस्टिम राबवावी लागणार आहे. जोपर्यंत पाणी निचरा करणार नाही तोपर्यंत…
धनंजय मुंडे : मी एक काम करतो. आपण आंदोलनामध्ये फार भाषणं केलेली दिसत आहेत.
मनिष जाधव : सर पूर्ण आयुष्य आंदोलनात गेलं. 27 वर्ष झाले.
धनंजय मुंडे : आपण जे सांगत आहात त्याची दखल घेऊन मी लगेच पुढच्या आठवड्यात आपल्या मुद्द्यावर मुंबईत बैठक बोलावतो आणि तुम्हालाही बोलावतो