Mumbai | रुग्णवाढीची धास्ती, पालिका मुख्यालयात आढावा बैठक, नियम कठोर करण्यासोबतच आयुक्त काय म्हणाले?
गेल्या काही दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यासोबत ओमिक्रॉनचाही वाढता धोका पाहता मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं.
मुंबई : वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आज मुंबईत (Mumbai) एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत कोविड (Covid-19) प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि यासाठी अधिक प्रभावी कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहे. महानगरपालिका (BMC) आयुक्तांनी नियमांचं कडक पालन (Strict action) केलं जावं, यासाठी काटेकोर उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत.
मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक
गेल्या काही दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यासोबत ओमिक्रॉनचाही वाढता धोका पाहता मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या विशेष आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ही कठोर आणि काटेकोरपणे केली जावी, असे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.
बैठकीत काय ठरलं?
- कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. यापूर्वीचे याबाबतचे अनुभव लक्षात घेता, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आपण अत्यंत सजग व सतर्क राहून अंमलबजावणी करावी. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे केली जावी.
- कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या जागा कोविड उपचार केंद्रांसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या; तसेच ज्या रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यात आल्या होत्या, त्याविषयीची माहितीही सुधारीत करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आलेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये संभाव्य गरजेनुसार ऑक्सिजनपुरवठ्याबाबत तातडीने खातरजमा करून घ्यावी. तसंच ऑक्सिजनची उपलब्धता ही राज्य शासनाच्या निर्देशांनुसार गरजेपेक्षा अधिक असावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
- मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं आणि वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे या बाबींवर अधिक भर देण्यासाठी प्रबोधन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘मास्क’ न लावणा-यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहे.
- वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयं आणि जम्बो कोविड रुग्णालयं यांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच रुग्णालयातील सर्व सोयी-सुविधा, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार योग्य ती खातरजमा करुन घ्यावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आलेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ (Ward War Room) यांच्या कामकाजाचा नियमित आढावा अधिक बारकाईने घेतला जाणार आहे.. तेथील मनुष्यबळ, तांत्रिक सेवा-सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देशही या बैठकीत घेण्यात आलेत.
- सर्व २४ विभागांमध्ये विभागांच्या स्तरावर सर्वंकष आढावा घेऊन सूक्ष्म स्तरीय नियोजन करण्याबाबत तयारी केली जाणार आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये आणि जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन केंद्रं सुरु करण्यात आली आहेत, त्यांच्या क्षमतेची चाचणी घेण्याचे आणि रुग्णालयांमधील प्रत्येक ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे आणि योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करुन घेण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्यात.
- लक्षणं आढळलेल्यांची चाचणी लवकर व्हावी यासाठी कोविड चाचणी केंद्राची माहिती ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधीत नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
महानगरपालिका मुख्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी, सह आयुक्त अजीतकुमार कुंभार, सह आयुक्त श्री. चंद्रशेखर चोरे, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि संजय कुऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर देखील या बैठकीला उपस्थित होते.
आजची मुंबईची आकडेवारी काय?
मुंबईत आज दिवसभरात 809 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात 335 बाधित कोरोनामुक्त झाले. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97% असून सध्या मुंबई पालिका क्षेत्रात 4765 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णदुपटीचा दर 967 दिवस असून रुग्णवाढीचा दर 0.07 टक्के आहे. दिवसभरात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये एक पुरुष तर दोन महिला रुग्ण होते. तिनही रुग्णांना दीर्घकालीन आजार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओडीओ –
इतर बातम्या –
रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक; आनंदराज आंबेडकर यांची जहरी टीका