मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे युवा नेते मेहबूब शेख यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेख यांच्याविरोधात अॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई | 28 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्यावर अॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या प्रकरणी फिर्यादी तरुणावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर क्रॉस एफआयआर दाखल केला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महेबूब शेख काल (27 डिसेंबर) रात्री आमदार निवास येथे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या रुमवर मुक्कामी होते. यादरम्यान एक तरुण मद्यधुंद अवस्थेत क्षीरसागर यांच्या रुमवर येऊन मुक्कामाचा हट्ट करु लागला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. आता याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘हा माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न’, मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिलीय. “बेवाडा येऊन आपल्याला शिवीगाळ करत असेल, त्यावर आपण प्रतिक्रिया देत असू, त्यावर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हा माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मी सुद्धा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मलाही मार लागलेला आहे. मला जो मार लागला आहे त्याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. ही घटना काल रात्री दहा वाजता घडली. त्यावेळी तो दारुच्या फूल नशेत होता. त्यावेळी त्याची मेडिकल तपासणी का केली नाही?”, असा सवाल मेहबूब शेख यांनी केला.