लोक झोपेत असताना समुद्राची लाट उसळावी असे पाण्याचे लोटचे लोट आले, असल्फातील घराघरात पाणीच पाणी; एवढं पाणी आलं कुठून?
घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी 72 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. शुक्रवार-शनिवारच्या रात्री ही पाईपलाईन अचानक फुटली.
मुंबई: घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये शुक्रवार-शनिवारच्या रात्री विचित्र प्रकार घडला. लोक रात्रीच्यावेळी खाऊनपिऊन झोपी गेलेले असतानाच अचानक गल्ल्यांमध्ये पाण्याचे लोटच्या लोट आले. सम्रदाच्या लाटा याव्यात तशा पद्धतीने पाण्याच्या लाटा प्रत्येक गल्लीतील घर आणि दुकानात घुसल्या. त्यामुळे घरातील संपूर्ण सामान वाहून गेलं. फर्निचर खराब झाले. तर अचानक घरात पाणी घुसल्याने लोक खडबडून झोपेतून जागी झाले अन् काही कळायच्या आत त्यांची पळापळ सुरू झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रहिवाशी चांगलेच घाबरून गेले होते.
घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी 72 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. शुक्रवार-शनिवारच्या रात्री ही पाईपलाईन अचानक फुटली. त्यामुळे पाण्याचे लोटचे लोट वस्तीत घुसले आणि घराघरांमध्ये तसेच दुकानात पाणी शिरले.
या पाण्याचा वेग इतका मोठा होता की 10 फूट उंचीपर्यंत पाणी वाहत होतं. समुद्राची लाट उसळावी, महापूर आल्यावर पाणी जसं उसळतं तसं पाणी उसळत असल्याचं पाहून रहिवाश्यांच्या काळजात धस्स झालं.
पोटमाळ्यावर बसले
घरात पाणी शिरलं तेव्हा लोक झोपी गेलेले होते. हळूहळू पाणी त्यांच्या घरात शिरलं. त्यामुळे लोक झोपेतून खडबडून जागी झाले. काहींनी तात्काळ विद्यूत प्रवाह बंद केला. तर काहींनी जीव वाचवण्यासाठी पोटमाळ्याचा आधार घेतला.
अन् काळजात धस्स झालं
घरांमध्ये कंबर एवढं पाणी साचल्याने अनेक महिला, म्हातारी माणसं आणि लहान मुलं घरात अडकून पडली होती. या सर्वांना घरा घरातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. अचानक एवढ्या प्रचंड प्रमाणात पाणी आल्याने लोकांच्या काळजात धस्स झालं होतं. पण पाईपलाईन फुटल्याची कळाल्यानंतर रहिवाश्यांनी महापालिकेवर प्रचंड संताप व्यक्त केला.
होतं नव्हतं सारं गेलं…
घरांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिकांचं हजारो रुपयांचं नुकसान झालं. फ्रिज, टीव्ही, फर्निचरचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच कपडे आणि भांडीकुंडी वाहून गेली आहेत. त्यामुळे महापालिकेने आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.
तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे संपूर्ण नाल्यातील घाण घरांमध्ये आली. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य झालं होतं. परिणामी स्थानिकांची अख्खी रात्र घरातील पाणी उपसण्यातच गेली.
ना अधिकारी आला, ना कर्मचारी
पाईपलाईन फुटल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती महापालिकेच्या कार्यालयात देण्यात आली. पण महापालिकेकडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी आला नाही. माहिती मिळाल्यानतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पण पाण्याचा प्रेशर इतका होता की तेही काही करू शकले नाही.