विधान परिषद निकालाआधी माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांचं मोठं विधान, कुणाचा होऊ शकतो गेम? थेटच सांगितलं
"काही महिन्यांपूर्वी एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी होती. त्यांचे आमदार आणि नेते यांच्यातील सलोखे, लागोबांधे लक्षात घेऊन आज एखादा आमदार जरी शिवसेना शिंदे गटात असला तरी तो आमदार दुसरी पसंतीचं मत हे शिवसेना ठाकरे गटाला देण्याची शक्यता आहे", असं गणित श्रीहरी अणे यांनी मांडलं.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आता लवकरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आमदारांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीचे मतं अशा हिशोबाने मतमोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी नेमकी कशी होते? याबाबतची सविस्तर माहिती माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली आहे. “विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया थोडी किचकट असते. पण थोडक्यात समजवून सांगायचे तर सर्व उमेदवार जितक्या जागा असते तितके उभे राहिले असते तर निवडणुकीचा प्रश्न उभा राहिला नसता. निवडणूक झाली नसती. प्रत्येकाला 1 जागा मिळू शकली असती. पण जिथे निवडणूक लढण्यासाठी जास्त लोकं आलेली आहेत, अशा परिस्थितीत कुणीतरी एलिमिनेट व्हावं लागतं”, असं श्रीहरी अणे यांनी सांगितलं.
“आता कुणाला एलिमिनेट करायचं हे ठरवण्यासाठी सिंगल प्रेपरेशन ट्रान्सफरेबल व्होट नावाचा फॉर्म्युला असतो. तो आपल्या कायद्यातच दिलेला आहे. त्या फॉर्म्युला प्रमाणे एक कोटा ठरवण्यात येतो की, कमीत कमी इतकी पहिल्या पसंतीची मते मिळाली की, एखादा उमेदवार निवडून येईल. आज तो कोटा हा 23 मतांचा आहे. याचाच अर्थ आज जे आमदार मतं देत आहेत त्यांच्यापैकी 23 आमदारांनी पहिली पसंती एका उमेदवाराला दिली तर तो उमेदवार जिंकणार आहे. आता एकाच राऊंडमध्ये सर्व 23 मते उमेदवाराला मिळू शकतात किंवा मिळू शकणार नाहीत. जर नीट नियोजन केलं तर 23 मिळू शकतं. काँग्रेसकडे आज 37 मतं आहेत. पण त्यांनी एकच उमेदवार दिल्याने त्यांचा उमेदवार जर क्रॉस व्होटिंग झालं नाही तर निश्चितपणे निवडून येऊ शकतो”, अशी माहिती श्रीहरी अणे यांनी दिली.
श्रीहरी अणे यांनी आकडेवारी मांडली
“भाजपचे 103 मतं आहेत आणि 5 उमेदवार आहेत. 5 पैकी कोणीतरी कमी-जास्त होऊ शकतो. पण तो भाजपचाच कमी होईल की कुणाचा कमी होईल हे इतरांना किती मतं पडतात त्यावर अवलंबून राहणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या कुणाला 23 मते पहिल्या पसंतीत मिळतील तो स्पष्टपणे विजयी ठरतो. निवडून आलेल्या माणसाची मते दुसरी पसंती ज्याला असेल त्याला ट्रान्सफर होतात. दुसऱ्या पसंतीच्या माणसाला अशा वेगवेगळ्या मतदाराची मते मिळाल्यानंतर 23 मते आल्यानंतर तो विजयी होतो. त्याची मते अजून तिसऱ्या माणसाला ट्रान्सफर होतात. अशी ही प्रोसेस चालते”, असं श्रीहरी अणे म्हणाले.
“कधीकधी अशी परिस्थितीत होते की, शेवटच्या वेळी अनेकांना 23 मते मिळत नाहीत. अशावेळी ज्याला सर्वात कमी मते मिळाली आहे तो एलिमिनेट होतो. ती मतं त्याच्या वरच्या लोकांना वाटली जातात. त्यामध्ये निवड केली जाते. निवडणूक होते तेव्हा प्रत्येक पक्ष त्यांच्या मित्र पक्षांबरोबर बसून एक प्लॅन बनवते जेणेकरुन मला लागणारे 23 मते मिळाल्यानंतर माझ्यानंतरचे माझ्याच पक्षाचे पहिल्या पसंतीचे मतं तुलाच दिले जातील आणि तुझ्या पार्टीचे पहिल्या पसंतीचे मतं मित्रपक्षाला दिले जातील. यामध्ये भीती अशी असते की, मी कितीही प्लॅन केलं तरी हे सिक्रेट बॅलेट आहे. कोण कुणाला मत देतं हे आपल्याला कळायला मार्ग नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला वापरलाच जाईल याची गॅरंटी नसते”, असं श्रीहरी अणे यांनी सांगितलं.
श्रीहरी अणे यांचा मोठा दावा
“एखादा आमदार आपल्या शत्रू पक्षाच्या उमेदवारालाही दुसऱ्या पसंतीचं मत देऊ शकतो. असं जर झालं तर हा फॉर्म्युला चालू शकत नाही. अशी होण्याची यावेळी दाट शक्यता आहे. त्याला कारणं अनेक आहे. मी राजकीय कारणात जात नाही. काही महिन्यांपूर्वी एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी होती. त्यांचे आमदार आणि नेते यांच्यातील सलोखे, लागोबांधे लक्षात घेऊन आज जरी मी शिवसेना शिंदे गटात असेल तरी माझी दुसरी पसंतीचं मत हे शिवसेना ठाकरे गटाला देण्याची शक्यता आहे”, असा मोठा दावा श्रीहरी अणे यांनी केला.
“तशीच स्थितीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबाबत आहे. असं क्रॉस व्होटींग झालं तर पहिल्या राऊंड नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळेल. दोन-तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येणार आहे यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटांमध्ये कोण कुणाच्या विरोधात जाऊ शकेल याचे आराखडे बांधता येऊ शकतील. या निवडणुकीचं महत्त्व यासाठीच आहे”, असं श्रीहरी अणे म्हणाले.