माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केले होते. विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी नायालयीन कोठडीत रवानगी करीत ईडी कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळली होती. त्याच्या एक दिवसानंतरच मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल करीत देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते.
मुंबई : कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायायलीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढला आहे. अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत संपली. यामुळे देशमुखांना कोर्टात हजर करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. याआधी शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायलायाने देशमुखांच्या ईडी कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली होती. आज मुदत संपल्यामुळे पुन्हा देशमुखांना न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात अनिल देशमुखांच्या वकिलांनी ईडी कोठडी वाढवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणातील अन्य आरोपी सचिन वाझेला अद्याप अटक का केली नाही. तसेच परमबीर सिंग यांना चौकशीसाठी का बोलावण्यात आले नाही, असे प्रश्न देशमुखांच्या वकिलांनी उपस्थित केले होते.
अनिल देशमुख 1 नोव्हेंबर रोजी केली होती ईडीने अटक
अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केले होते. विशेष सुट्टीकालीन न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी नायालयीन कोठडीत रवानगी करीत ईडी कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळली होती. त्याच्या एक दिवसानंतरच मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल करीत देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते. ही मुदत संपताच देशमुख यांना शुक्रवारी पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली होती.
सचिन वाझेने अनिल देशमुखांच्या आदेशावरुन बार मालकांकडून पैसे वसुल करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे फिर्यादीने म्हटले होते. ईडी याप्रकरणी वाझेचा जबाब नोंदवण्यासाठी संबंधित न्यायलयाची अनुमती घेण्याची प्रक्रिया करीत आहे. वाझे जबाबानुसार नवीन पुराव्यांबाबत विचारपूस करण्यासाठी देशुमखांना कोठडीत ठेवणे जरुरी असल्याचे ईडीने म्हटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. (Former Home Minister Anil Deshmukh’s stay in jail extended again; Extension of judicial custody till September 29)
इतर बातम्या
Kerala RSS worker killed: 27 वर्षीय संघ कार्यकर्त्याची पत्नीसह बाहेर जाताना धारदार शस्त्रानी हत्या