अज्ञातांनी ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांची गाडी फोडली, नेमकं घडलं काय?
दत्ता दळवी यांना न्यायालयीन कोठडी बजावण्यात आल्यानंतरही शिंदे आणि ठाकरे गटातील वाद कमी होताना दिसत नाही. काही अज्ञात तरुण आज संध्याकाळी दत्ता दळवी वास्तव्यास असलेल्या इमारतीत शिरले. त्यांनी इमारत परिसरात दत्ता दळवी यांच्या उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.
मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या गाडीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता दळवी यांच्या भांडूप येथील इमारतीच्या परिसरात शिरुन गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आलीय. तसेच त्यांना न्यायालयीन कोठडीदेखील सुनावली आहे. त्यानंतर आता भांडूपमध्ये त्यांच्या इमारतीत शिरुन त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दत्ता दळनी यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या टीकेमुळे शिंदे आणि ठाकरे गटात नवा वाद निर्माण झाला होता. दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणावरुन टीका केली होती. त्यानंतर दत्ता दळवी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकरणावरुन आता वातावरण निवळेल, असं वाटत होतं. पण काही अज्ञातांनी दता दळवी यांच्या राहत्या घराजवळ जावून त्यांच्या इमारतीची तोडफोड करण्यात आली. तीन ते चार अज्ञात तरुण गाडीची तोडफोड करण्यासाठी आले होते. त्यांनी मोठमोठ्या दगडांनी गाडीची तोडफोड केली. या तोडफोडीत गाडीचे काच फुटले आहेत. संबंधित घटना घडल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. विक्रोळी पोलीस आता या प्रकरणी तपास करत आहेत. तोडफोड करणारे कोण होते? याचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाबद्दल बोलताना अपशब्द वापरले होते. दत्ता दळवींनी भांडूपमधील कोकणवासीयांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्दांचा वापर केला. त्यानंतर शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख भूषण पालांडे यांनी दळवी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. भांडूप पोलिसांनी याप्रकरणी दत्ता दळवींवर गुन्हा दाखल करत अटक केली. दत्ता दळवींना 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
दुसरीकडे दत्ता दळवी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी शिवीगाळ केली नाही. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी बोललो तो शब्द फार मोठा नाही. मी फक्त आनंद दिघे धर्मवीर चित्रपटात बोलले तो शब्द बोलून दाखवलं, असं दत्ता दळवी म्हणाले आहेत. त्यानंतर दत्ता दळवी यांच्या गाडीची चार अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.