गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : निवडणुकीला अजून अवकाश असतानाच शिंदे गटातील धुसफूस समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघावर दावा केला आहे. कीर्तिकर लढणार नसेल तर सिद्धेश कदम तिथून लढतील असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यावरून गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम यांना चांगलच सुनावलं आहे. एका कुटुंबात दोन भावांना तिकीट देता येईल का? पक्षाला तरी ते परवडेल का? आणि अजून मी माघार घेतलेली नाही. मी मैदानात आहे, अशा शब्दात गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम यांना सुनावले आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सिद्धेश कदमसाठी रामदास कदम परवा बोलले. सिद्धेश निवडणूक लढेल, असं रामदास कदम म्हणाले. एका घरात दोन भावांना तिकीट देता येईल का? हे कोणत्या पक्षाला जमेल का? पक्ष करेल का? पक्षाने ठरवलं तर मी विरोध करणार. मी निवडणूक लढणार आहे, आणि निवडणूक लढल्यावर यश मिळेल हे मी ठामपणे सांगतोय. पण तरीही पक्षाला मला तिकीट द्यायचं नसेल तर त्यांनी ते चांगल्या माणसांना द्यावं, असं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.
मला मंत्री बनायचे नाही. राज्यपाल बनायचे नाही किंवा संसदेचं उपाध्यक्ष बनायचं नाही. पण याचा अर्थ मी निवडणूक लढणार नाही असा होऊ शकत नाही. मी निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार आहे. निवडणूक लढण्याची माझी पूर्ण तयारी झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उमेदवारी ठरवण्याचे निर्णय झालेला नाही. मला निवडणूक लढावी लागेल आणि मी लढणार हे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे. कोणत्याही परिस्थिती मी जिंकणार आहे. मागच्यावेळी मी पावणे तीन लाख मतांनी जिंकून आलो. यावेळी मी साडे तीन लाख मतांनी विजयी होईल अशी मला खात्री आहे. मला निवडून यायचं आहे. माझं वय झालं याचा अर्थ ही माझी कमजोरी नाही. पूर्णपणे दिल, दिमाग सगळं शरीर एकदम स्ट्रॉंग आहे. मी काम करतोय. जनतेशी संपर्क ठेवतो. पक्षाचे जेवढे उपक्रम आहेत त्यात मी भाग घेतो. नेतृत्वही करतो, असं सांगतानाच निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे, असं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.
100 कोटींची विकासकामे मी या मतदारसंघांमध्ये केलेली आहेत. कार्यकर्त्यांमुळे चांगलं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे. आता या पक्षांमध्ये काही माणसं आलेली आहेत, ते नेतृत्व करतात. त्यांचे काही छुपे अजेंडे असतात, असंही ते म्हणाले.
रामदास कदम यांनी स्वत:च्या मुलाच्या निवडणुकीबाबत भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या सहकाऱ्याचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना अमरावतीत तिकीट मिळवून द्यावं. त्याबद्दल बोलावं आणि सांगावं. माझ्याबरोबर या पक्षामध्ये 13 खासदार आलेले आहेत. 40 आमदार आलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार नाही. आज रामदास कदम टीव्ही9 वर बोलल्यानंतर माझी आता जबाबदारी वाढली ना पुन्हा टीव्ही समोर येऊन सांगायची, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्याबाबतही भाष्य केलं. मी अमोलला स्पष्ट सांगितलं. तुला ठाकरे गट सोडून यायचं की नाही याचा निर्णय तुझा तू घे. पण मी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे, तिथून तू निवडणूक लढू नकोस. तसेच माझ्याविरोधात प्रचारही करायचा नाही. महाराष्ट्रात कुठेही जाऊन तू निवडणूक लढ. त्याला माझी हरकत नाही. पण माझ्याविरोधात लढू नको. दापोली, दाभोळ, खेड, पलगड हा जो संपूर्ण भाग आहे तिथून तू तिकडून निवडणूक लढ. तिथे मी तुझ्या विरोधात प्रचार नाही करणार, असं मी अमोलला सांगितलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.