डोंबवलीतील ‘बाबा आमटेंना’ पद्मश्री, काय आहे गजानन माने यांचे कार्य
गजानन माने ६० वर्षांपूर्वी डोंबिवलीत राहण्यास आले अन् डोंबिवलीकर झाले. लष्करातून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले जीवन समाजकार्यासाठी वाहिले. निवृत्तीपासून आतापर्यंत सलग ३२ वर्ष त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी अविरत कार्य केलं.
कल्याण : कल्याण डोंबिवलीत काका म्हणून परिचित असलेले गजानन माने (gajanan mane). खरंतर त्यांना डोंबिवलीतील बाबा आमटेही म्हणता येईल. त्यांनी ३२ वर्ष केलेल्या समाजकार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. अन् यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांना पद्मश्री पुरस्कार (padma shri award) जाहीर झाला. गजानन माने ६० वर्षांपूर्वी डोंबिवलीत राहण्यास आले अन् डोंबिवलीकर झाले. लष्करातून ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले जीवन समाजकार्यासाठी वाहिले. निवृत्तीपासून आतापर्यंत सलग ३२ वर्ष त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी अविरत कार्य केलं.
कशी झाली सुरुवात
गजानन माने यांनी स्वत:ला समाज कार्यसाठी वाहून घेतल्यानंतर त्यांना कुष्ठरुग्ण भिक्षा मागून उपजीविका करत असल्याचे दिसले. त्यांच्या व्याधीवर उपचारा करणारा दवाखाना त्यांनी या भागात सुरू केला. त्यांच्या वसाहतीत त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन देत स्वत:ची उपजिविका चालवण्याचे काम दिले. त्यांना स्वावलंबी बनवले. शहरातील कुष्ठरुग्ण भिक्षा मागण्यासाठी दिसणार नाहीत. हा वसा घेत त्यांनी पत्रीपुला जवळील १९९० मध्ये सामाजिक कार्याला सुरूवात केली.
हनुमाननगर कुष्ठ रुग्ण वसाहतीमधील कुष्ठ रुग्णांच्या ऊपजीविकेचा प्रश्न त्यांनी सोडवला. या भागात शिधावाटप दुकान सुरू केले. मुलांसाठी शाळेची व्यवस्था केली. कुष्ठरुग्णांच्या उपचारासाठी पालिकेचा दवाखाना सुरू केला. वसाहती मधील ४० युवकांना कल्याण डोंबिवली पालिकेत कामाला लावले. महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले. त्यांना शासकीय योजनेतून शिवणयंत्र उपलब्ध करुन दिले. घराघरात मेणबत्त्या, पणत्या, अगरबत्तीचे व्यवसाय सुरू केले. या वस्तूंची फक्त निर्मिती करुन थांबले नाही तर या वस्तुंना बाजारपेठ मिळून दिली.
कोण आहे हे गजानन माने
गजानन माने यांनी भारतीय नौदलमध्ये १२ वर्ष सेवा केलेली आहे. भारत पाकिस्तानच्या १९७१ च्या युध्दात देखील त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुष्ठरुग्णांसाठी राज्यातील पहिलं रुग्णालय उभारले.२०१८ पासून तरुण मुला- मुलींना सैन्य दलात भरती होण्यासाठी ते प्रेरणा देत आहेत.