इथेच फेडायचंय, जैसी करणी वैसी भरणी, 12 वर्ष जेलमध्ये, आता कठोर शिक्षा

| Updated on: Jan 17, 2024 | 9:18 PM

जसे कर्म तसं आपल्याला फळ मिळतं, त्यामुळे चांगले कर्म करावे, असं नेहमी म्हटलं जातं. याशिवाय कूकृत्य करणाऱ्यांना इथेच फेडायचं आहे, असंही म्हटलं जातं. याच गोष्टीचा प्रत्यय आता मुंबईत गँगस्टर गोपाळ पांडे गँगमधील 5 आरोपींना येताना दिसतोय. त्यांच्या क्रूर कृत्यामुळे त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणी ते 12 वर्षांपासून जेलमध्येच आहेत.

इथेच फेडायचंय, जैसी करणी वैसी भरणी, 12 वर्ष जेलमध्ये, आता कठोर शिक्षा
Follow us on

गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 17 जानेवारी 2024 : मुंबई सत्र न्यायालयाने 12 वर्षांपूर्वीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे पाचही आरोपी गँगस्टर गोपाळ पांडे गँगमधील होते. या गँगचा म्होरक्या गोपाळ पांडे याचा 2020मध्ये न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला होता. तर त्याच्या इतर 5 जोडीदारांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींवर बोरीवली पोलीस ठाण्यात कलम 365, 302, 201, 420, 457, 465, 468, 471, 380, 364, 342, 404, 392, 34 अंतर्गत गुन्हे दाखल होते. आरोपींनी खूप निर्घृण असं कृत्य केलं होतं. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पठाण यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी 26 एप्रिल 2012 ला बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणातील फिर्यादी यांचे लहान भाऊ नितीन रतिलाल ढकान यांची आरोपींनी अपहरण करुन हत्या केली होती. आरोपींनी अतिश निर्घृणपणे नितीन यांची हत्या केली होती. आरोपींनी नितीन ढकान यांना त्यांच्याजवळ असलेल्या इनोव्हा कारसह पळवून नेलं होतं. त्यानंतर त्यांनी नितीन यांना एका बंद खोली बंदिस्त करुन ठेवलं होतं. आरोपी अपहरण करुनच थांबले नाहीत. तर त्यांनी नितीन यांना इतकी मारहाण केली की त्यात नितीन यांचा मृत्यू झाला. आरोपींनी नितीन यांना जीवे ठार मारल्यानंतर निष्ठूरतेची परिसीमा गाठली होती. त्यांनी नितीन यांचा मृतदेह तुंगारेश्वर येथील जंगलात नेला होता. तिथे आरोपींनी मृतदेहाला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलीस तपासात आरोपींचं कृत्य निष्पन्न

या प्रकरणी 30 एप्रिल 2012ला बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 13 जून 2012 ला आरोपींनी अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपींनी संगनमताने नितीन ढकान यांचे अपहरण करून त्यास जीवे ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह तुंगारेश्वर येथील जंगलात जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

या केसमधील आरोपी क्र.1 गँगस्टर आणि टोळीप्रमुख गोपाळ साधूशरण पांडे याचा फेब्रुवारी 2020 मध्ये न्यायालयीन कोठडीत असताना कारागृहामध्येच मृत्यू झाला. तर आरोपी क्र. 2 – हरून इब्राहिम शेख, आरोपी क्र.3 – बिरबल रामविलास सिंग, आरोपी क्र.4 – ब्रिजेश शंभुनाथ मिश्रा, आरोपी क्र. 5 अभिजीत अनंत भोसले, आरोपी क्र. 6 – सचिन राजाराम चोरगे हे जून 2012 पासून कारागृहात अटकेत आहे. त्यांना कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सदर केसचे काम विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून वैभव बगाडे यांनी पाहिले आहे. तपासी अधिकारी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांनी यातील साक्षीदारांना सुनावणीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करून गुन्हा दाखल झाल्यापासून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आरोपींना शिक्षा होईल याची खबरदारी घेतली आहे.

तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म.स.पो.उ.नि. माने, पो.ह. चित्ते, से.नि. म.पो.उ.नि बगाडे, म.पो.शि कदम, पोनि (गुन्हे) रायटर पो.ह. हरिष राणे, सावर्डेकर तसेच समन्स वॉरंट पथकातील पो.ह. कोंडविलकर, निजाई यांनी संपूर्ण खटल्यामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच दिंडोशी कोर्टातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे योगदान आहे.