BIG News | आधी मुख्यमंत्री-शरद पवार भेट, आता गौतम अदानी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्योगपती गौतम अदानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्योगपती गौतम अदानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. सिल्व्हर ओक हे शरद पवार यांचे निवासस्थान आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट होत आहे. त्यामुळे या भेटीचं मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचं काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. ते वर्षा येथून काही प्रतिक्रिया न देताच निघून गेले. तर मुख्यमंत्र्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. तसेच शरद पवारांनी एका कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. पण या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
गौतम अदानी यांनी पवारांची आधीही घेतलीय भेट
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. गौतम अदानी यांनी याआधीदेखील अनेकवेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. ज्यावेळेला संसदेत गौतम अदानी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. अदानी यांच्या जीपीएस चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.
शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या जीपीएस चौकशीला विरोध केलेला. पण काँग्रेसने जीपीएस चौकशीची मागणी लावून धरलेली. त्यामुळे मोठ वाद निर्माण झालेला. अखेर काँग्रेस आणि इतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शरद पवार त्यांच्या वक्तव्यापासून बॅकफूटवर आलेले बघायला मिळाले होते.
नेमकी भेट का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट होत आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीमागचं कारण सांगितलेलं नाही. असं असताना अचानक गौतम अदानी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. या भेटीमागचं नेमकं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे या भेटीमागे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. असं असताना आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची नेमकी भेट का घेतली?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. “शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. या संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार आले होते”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“ही सदिच्छा भेट होती. या बैठकीत काही चर्चा झाली नाही. या भेटीत निमंत्रण होतं. याशिवाय काही एक-दोन छोटे विषय होते. यामध्ये शाळांचा विषय होता, कलावंतांचा विषय होता. मुख्य म्हणजे त्यांचं निमंत्रण होतं. अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. त्याचे ते अध्यक्ष आहेत. बाकी काही नाही”, असं शरद पवार ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हणाले.