बेकायदेशीर होर्डिंग लावणारा आरोपी भावेश भिंडे फरार कसा झाला?
मुंबईत काल वादळ वाऱ्यामुळं होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. त्या 14 जणांच्या घरातला आक्रोश अजून थांबलेला नाही आणि इकडे राजकारण सुरु झालंय. तर, बेकायदेशीर होर्डिंग लावणारा आरोपी भावेश भिंडे फरार आहे.
घाटकोपरमध्ये वादळानं अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि 14 निरपराधांचा जीव गेला. तर 80 हून अधिक जण जखमी झाले. आणि आता, हे बेकायदेशीर होर्डिंग लावणारा इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे फरार आहे. भाजपच्या मीडिया सेलनं भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो ट्विट केला आणि मुख्यमंत्री असताना टक्केवारी घेवून परवानगी दिल्याचा आरोप केला. पण त्याचवेळी सरकारचे मंत्री छगन भुजबळांनी फोटोंवरुन, ठाकरेंचा काय दोष म्हणत, ते ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले आहेत. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. पण पोलीस त्याच्या घरी पोहोचायच्याआधीच तो फरार झाला.
कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं 120 बाय 120 फुटाचं होतं. भलं मोठं होर्डिंग उभारण्यासाठी झाडांवर विष प्रयोग करुन झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील वाऱ्याचा वेग पाहता 40 बाय 40 फुटापर्यंतच्याच होर्डिंगला परवानगी असते. कोसळलेल्या होर्डिंगजवळ कंपनीचेच 80 बाय 80 फुटांचे आणखी 3 होर्डिंग आहेत. भावेश भिंडेने 2009 मध्ये मुलुंड विधानसभेची निवडणूक लढवल्याची माहिती आहे. भावेश भिंडेवर होर्डिंग प्रकरणाचे जवळपास 26 गुन्हे दाखल आहेत, ज्यात बलात्काराचाही गुन्हा आहे.
होर्डिंगच्या दुर्घटनेत 14 कुटुंबाच्या घरातला व्यक्ती कायमचा गेला. दुसरीकडे मुंबई महापालिका आणि रेल्वे कडून होर्डिंगची परवानगी आणि जागेवरुन हात झटकणं सुरु आहे. महापालिकेनं म्हटलंय की, होर्डिंगसाठी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्याकडून परवानगी देण्यात आली. महापालिकेची कोणतीही परवानगी नव्हती. तर ही जागा आपल्या मालकीची नसल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलंय. होर्डिंग पडण्याच्या काही तासांआधीच होर्डिंग हटवण्यासाठी आणि दंडात्मक 6 कोटी 13 लाख रुपये भरण्यासाठी नोटीसही महापालिकेनं बजावली होती.
मुंबईत मरण स्वस्त आहे का?
मुंबईच काय अख्ख्या महाराष्ट्रात असे अनेक बेकायदेशीर होर्डिंग आहेत. फक्त कोणाचा जीव गेल्यावरच, सरकारला जाग येते. ऑडिटचे आदेश दिले जातात आणि दुसऱ्या दिवसापासून जैसे थे… मग होर्डिंग असो, आगीच्या घटना असो की ब्रिज कोसळून मुंबईकरांचे मृत्यू… सवाल हाच आहे की मुंबईत मरण स्वस्त आहे का? मुंबईतल्या आगीच्या घटनांनंतर झालेल्या ऑडिटचं काय झालं? मुंबईतल्या आतापर्यंतच्या आगीच्या घटनेनंतर किती बिल्डरांवर कारवाई झाली? मुंबईत पूल कोसळल्याच्या घटनेत ऑडिटनंतर कोण जेलमध्ये गेलं? अशा अनेक प्रश्न आहेत.
सरकारनं मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा जाहीर केली. पण, त्या 5 लाखांत गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही किंवा ज्या कुटुंबातला कर्ता व्यक्ती गेला त्या कुटुंबाचं आयुष्यभर भागणार नाही. दुर्घटना घडलेल्या याच पेट्रोल पंपावर 22 वर्षांचा सचिन यादव काम करत होता ज्याचा छाती आणि डोक्यावर मार लागल्यानं राजीवाडी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. किमान या घटनेनंतर तरी मृत्यू बनून उभी असलेली अनधिकृत होर्डिंग हटवले जातील आणि कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा!