मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप, कुणाला कोणता बंगला?

| Updated on: Jul 11, 2023 | 7:22 PM

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या 8 मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप, कुणाला कोणता बंगला?
AJIT PAWAR OATH
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? असा प्रश्न सारखा चर्चेत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल, अशी प्रतिक्रिया देण्यात येतेय. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला नाही. विशेष म्हणजे सत्तेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट सहभागी झाला आहे. त्यानंतर आता हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना शासकीय बंगले आणि कार्यलयांचं वाटप करण्यात आलं आहे.

कोणत्या मंत्र्याला कोणती बंगले?

मंत्री छगन भुजबळ यांना सिद्धगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सुवर्णगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांना प्रचितगड बंगला देण्यात आला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुचि-3 बंगला देण्यात आला आहे.
मंत्री अनिल पाटील यांना सुरुचि-8 हा बंगला देण्यात आला आहे.
मंत्री संजय बनसोडे यांना सुरुचि-18 हा बंगला देण्यात आला आहे.

कोणत्या मंत्र्याला कोणतं दालन?

मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दक्षिण बाजूचं असलेलं 201 क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांना मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 407 क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे.

मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या उत्तरेकडील बाजूचे 303 क्रमांकाचे दालन देण्यात आलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 201, 204 आणि 212 क्रमांकांचे अशी दालनं देण्यात आली आहेत.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील 601, 602 आणि 604 क्रमांकाची दालनं देण्यात आली आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील 103 क्रमांकाचे दालन देण्यात आलं आहे. हे दालन पहिल्या मजल्यावर उत्तरेच्या दिशेला आहे.

मंत्री अनिल पाटील यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 401 क्रमांकाचं दालन देण्यात आलं आहे. हे दालन दक्षिण बाजूला आहे.

मंत्री संजय बनसोडे यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील 301 क्रमांकाचं दक्षिण बाजूचं दालन देण्यात आलं आहे.

फक्त भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाला फक्त भाजपच्या कोट्यातील महत्त्वाची खाते मिळणार आहेत. यामध्ये वित्त खातं तसेच महिला बाल विकास विभागाचा समावेश आहे.