दिल्लीत विलीनीकरण झालं, महाराष्ट्रात का नाही? आम आदमी पार्टीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सवाल
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आज आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारनेही एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे, अशी भूमिका घेतली.
मुंबईः आझाद मैदानावर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) राज्यस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना (ST Strike) आणि आंदोलनाला आमचा पूर्ण पाठींबा आहे, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. एसटी महामंडळ राज्य शासनात (Maharashtra State Government) विलीन होण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आंदोलन करत आहेत. यात विविध राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात आज आम आदमी पार्टीनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली.
‘सरकारला विलीनीकरण नको असेल तर पायउतार व्हावं’
आझाद मैदानावर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय आंदोलनाला आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी आम आदमी पार्टीचे नगरसेवक दीपक सीलान यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, एसटी कामगारांना खासगीकरणाची नव्हे तर विलिनीकरणाची गरज आहे. सरकारला ते करता येत नसेल तर सरकारने तत्काळ पायउतार व्हावं. विलीनीकरण शक्य असून आम्ही ते दिल्लीत करून दाखवलं. एकिकडे पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे मागे घेतले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारलाही एसटी कर्मचाऱ्यांचं ऐकावंच लागेल. एसटी महामंडळाचं विलीनीकरण नक्कीच शक्य आहे, फक्त सरकारची इच्छा असली पाहिजे, असं मत सीलान यांनी यावेळी व्यक्त केलं.
आंदोलनाला हिंसक वळण लागू शकते- भाजपचा इशारा
आझाद मैदानावर जवळपास 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र राज्यभर सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत, असा आरोप आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणाहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या, मात्र या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे या आंदोलनाला कधीही हिंसक वळण लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
इतर बातम्या-