तुमच्या परिसरात डेंग्यू, मलेरियाचे डास आढळल्यास थेट कारवाई होणार
आतापर्यंत डेंगी डासांची उत्पत्ती आढळलेल्या सोसायट्या, खासगी बांधकाम व्यावसायिकांसह आदी 151 जणांना नोटीसा जारी केल्या असून त्यांच्याकडून 14 हजार रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे, असेही सागर यांनी सांगितले.
मुंबई : मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सूरु असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी महानगरपालिका, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून नियमित तपासणी व उपायोजना केल्या जात आहेत. या तपासणी दरम्यान शासकीय प्रकल्प किंवा खासगी प्रकल्पाच्या ठिकाणी रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
मुंबईतील मेट्रो प्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी गढूळ पाण्यामुळे आजार पसरविणाऱ्या डांसाच्या उत्पत्ती बाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना योगेश सागर बोलत होते.
राज्यमंत्री योगेश सागर म्हणाले, “मुंबई शहर आणि उपनगरात सूरु असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनच्या एजन्सीने डास प्रतिबंधाच्या कामांना सुरुवात केली आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएनेही स्वतंत्र यंत्रणा नेमली आहे. त्यांच्यामार्फत मलेरिया व डेंगी आजाराच्या रुग्णांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत असून महापालिकेच्या इतर विभागांशी समन्वयाने वस्तीपातळीवर साथीच्या आजाराच्या नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.“
तसेच, आतापर्यंत डेंगी डासांची उत्पत्ती आढळलेल्या सोसायट्या, खासगी बांधकाम व्यावसायिकांसह आदी 151 जणांना नोटीसा जारी केल्या असून त्यांच्याकडून 14 हजार रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे, असेही सागर यांनी सांगितले.
“मुंबई मेट्रो लाईन-3 प्रकल्पांतर्गत स्थानकांच्या खोदकामा ठिकाणी जमीनीतून झिरपणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रत्येक स्थानकात आवश्यक क्षमतेच्या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका, मेट्रो प्रशासन व संबधित कंत्राटदार यांच्या समन्वयाने नियमितरित्या डास अळीनाशक फवारणी आणि धुम्र फवारणी करणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रसंगी प्रत्येक सोसायटीतील लोकांचा मोहिमेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.“ अशी माहितीही योगेश सागर यांनी दिली.
“मुंबई महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात विधानभवन मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामध्ये मलेरिया पसविणाऱ्या ऍनॉफिलीस जातीच्या डासांची उत्पत्ती दोन ठिकाणी आढळून आली असून या ठिकाणी किटकनाशक फवारणी करून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहे. या परिसरामध्ये महानगरपालिकेमार्फत ताप सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणादरम्यान मलेरिया व डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले नाही.” असे योगेश सागर यांनी सांगितले. तसेच, काही दिवसांआधी या भागातील गाडगीळ परिवाराला या आजाराची लागण झाल्याची घटना घडली होती, त्यांची राज्यशासनाने गंभीर दखल घेतली असून तशी लागण यापुढे कोणत्याही परिवाराला होणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे, असेही सागर यांनी नमूद केले.
दरम्यान, महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या प्रकल्पाच्या पारिसरात रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांची नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री योगेस सागर यांनी यावेळी दिली.