राज्यपाल कोश्यारी लवकरच पदमुक्त होणार?; महाराष्ट्राच्या नवीन राज्यपाल पदासाठी या नावांची चर्चा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आता राज्यपालपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना याबद्दल विचारणा झाली असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Koshyari) लवकरच पदमुक्त होणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राला याच महिन्यात नवीन राज्यपाल मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडं राज्यपाल पदावरून मुक्त करा, अशी विनंती केली. त्यामुळं राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त केल्यास नवीन राज्यपाल येण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे नाव चर्चेत होते. याशिवाय आणखी काही नावांची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आता राज्यपालपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना याबद्दल विचारणा झाली असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
या नावांची चर्चा
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदसिंग आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. येडियुरप्पा यांच्या नावाची चर्चा आहे. नारायण राणे यांच्याकडे इतर राज्याच्या राज्यपालपदासाठी विचारणा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदद्ल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधी पक्ष एकवटला. मात्र, राज्यपालपदी कोश्यारी अद्याप कायम आहेत. कोश्यारी हे नेहमी महापुरुषांचा अपमान करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी दिली.
कुणाचे नाव आघाडीवर?
कोश्यारी यांना पदमुक्त केल्यास नवे राज्यपाल कोण येणार याबद्दल उत्सुकता आहे. परंतु, नवे राज्यपाल कोण येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांचं नाव चर्चेत आघाडीवर आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचंही नाव चर्चेत आहे. याशिवाय कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. येडियुरप्पा यांच्या नावाचीही चर्चा आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यपालपदासाठी विचारणा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी यांची तुलना मोठ्या नेत्यांसोबत केली होती. या त्यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असेल, असं विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. खरंच राज्यपाल कोश्यारी लवकरच पदमुक्त होतात का, आणि झाल्यास नवे राज्यपाल म्हणून कोण येणार याबाबत उत्सुकता आहे.