मुंबई हायकोर्टाकडून गुणरत्न सदावर्ते यांना समज, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
वकिलीची सनद रद्द झाल्याबद्दल सदावर्तेंनी हायकोर्टात घेतलेली धाव निष्फळ ठरलीय. तूर्तास यावर काहीही निर्णय न देता सदावर्तेंनी बार काऊन्सिलऑफ इंडियाकडे जावं, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. मात्र सुनावणीदरम्यान सदावर्तेंचा आवाज वाढल्यामुळे कोर्टानं त्यावरुन सदावर्तेंना समजही दिलीय.
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) माध्यमांसमोर बोलताना नेहमी मोठ्यानं बोलतात. मात्र त्याच आवाजात सदावर्ते कोटातही बोलू लागल्यामुळे हायकोर्टानं सदावर्तेंना समज दिलीय. मुद्दा होता 2 वर्षांसाठी रद्द झालेली सदावर्तेंच्या वकिलीच्या सनदीचा. एसटी संपात वकिलीचा पोशाख घालून सहभागी होणं आणि डान्स करणं यावर सुशील मंचरकरांनी तक्रार दिली होती. तक्रारीवरुन बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्रानं सदावर्तेंची सनद रद्द केली. त्याविरोधात सदावर्ते हायकोर्टात गेले. सदावर्ते कोर्टात बाजू मांडत असताना त्यांची भाषा आक्रमक झाली आणि त्यांचा आवाज मोठा होता.
गुणरत्न सदावर्ते म्हटले की, माध्यमं माझी बदनामी करत आहेत. त्यावरुन न्यायाधीश म्हणाले की, तुम्ही आता माध्यमांसमोर नाहीत. तर कोर्टात दाद मागायला आला आहात, याचं भान राखा. तुम्हाला माध्यमांसमोर जे बोलायचं असेल ते माध्यमांपुढे बोला. आता तुम्ही कोर्टापुढे आहात. माध्यमं त्यांचं काम करतील आणि कोर्ट आपलं काम करेल.
हायकोर्टाने जयश्री पाटील यांनाही सुनावलं
जेव्हा सदावर्ते त्यांची बाजू मांडत होते, तेव्हा त्यांच्या पत्नी जयश्री पाटीलही काही मुद्दे मांडू इच्छित होत्या. मात्र त्यावरुनही कोर्टानं जयश्री पाटलांना समज दिली. वकिलीची प्रॅक्टिस करण्याच्या बेसिक गोष्टी तरी तुम्हाला माहित आहेत का? असा प्रश्न न्यायमूर्तींनी केला. जेव्हा सिनियर युक्तिवाद करत असेल तेव्हा ज्युनियर यांनी बोलायचं नसतं, असंही न्यायमूर्ती म्हणाले.
थोडक्यात बार काऊन्सिलनं रद्द केलेली वकिलीच्या सनदीवर हायकोर्टानं निर्णय दिला नाही. हायकोर्टानं सदावर्तेंना सांगितलं की तुम्ही याविरोधात बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडे जा. जर तिथं न्याय मिळाला नाही, तर तुम्ही पुन्हा हायकोर्टाकडे दाद मागू शकता. दरम्यान, सुनावणीनंतर माध्यमांसमोर बोलताना आपल्या भजनाला डान्स म्हटलं गेल्याचा दावा सदावर्तेंनी केलाय. यावरुन त्यांनी बार काऊन्सिलसह विरोधकांनाही जबाबदार धरलं.
सदावर्तेंनी वकिली पेशाच्या आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार सुशील मंचरकरांनी बार काऊन्सिलकडे केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांची समिती बसली. सदावर्तेंनी बार काऊन्सिचा नियम 7 चं उल्लंघन केल्याचं समितीनं म्हटलं आणि सदावर्तेंची सनद दोन वर्षांसाठी रद्द झाली. म्हणजे पुढची दोन वर्ष सदावर्तेंना कोणतीही केस लढवता येणार नाही. मात्र ही कारवाई सूडबुद्धीनं झाल्याचा दावा सदावर्तेंचा आहे.
एसटी संपाच्या आंदोलनात ‘मेरी चलती है हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट में’, असं एकदा सदावर्ते म्हटले होते. मात्र तूर्तास तरी हायकोर्टानं सदावर्तेंना कोणताही दिलासा दिलेला नाही.