navneet rana and ravi rana: नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, शुक्रवारी जामिनावर फैसला
navneet rana and ravi rana: नवनीत राणा आणि रवी राणा यांना आज कोर्टात हजर करण्यात आले.
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाचे न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे राणा दाम्पत्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी तात्काळ वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, कोर्टाने ज्यांचा जामीन अर्ज राखून ठेवाला. येत्या 29 एप्रिल रोजी त्यांच्या जामीन अर्जावर फैसला होणारा आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. पोलिसांनी (police) रिमांड कॉपीत राणा दाम्पत्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा यांच्यावरील आरोप किती गंभीर आहेत याची माहिती कोर्टाला दिली. तर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत राणा दाम्पत्यांच्या पोलीस कोठडीला विरोध केला आहे. राणा दाम्पत्यांवर खार पोलीस ठाण्यात 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजासमाजात तेढ निर्माण केल्याचा या दोघांवरही आरोप ठेवण्यात आला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत यावेळी पहिल्यांदा युक्तिवाद करतील अशी अपेक्षा होती. मात्र, राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सुरुवातीला युक्तिवाद केला. त्यांनी राणा दाम्पत्यांवरील गुन्हा चुकीचा असल्याचं सांगतानाच त्यांची अटकही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. तर, राणा दाम्पत्यांवरील गुन्हा गंभीर आहे. त्यांनी सामाजिक तेढ निर्माण केली आहे. या मागे काही कट कारस्थान होतं का? याचा तपास करायचा असल्याने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. तब्बल 20 मिनिटे हा युक्तिवाद सुरू होता.
पर्याय काय?
राणा दाम्पत्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यावर कोर्टाने येत्या 27 तारखेला त्यांचं लेखी म्हणण्यास मांडण्यास सांगितलं आहे. त्यानंतर या विषयावर 29 एप्रिल रोजी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना 29 एप्रिल पर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना ऑर्थर रोड तुरुंगात पाठवलं जाणार आहे. मात्र, राणा दाम्पत्य उद्या नियमित न्यायालयात जामीन अर्ज करणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.