मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राजकीय (Political) फटकेबाजीचा ड्रामा अख्या देशानं पाहिला. राजकारणात महाराष्ट्रातील सत्तांतर हा मोठा चर्चेचा विषय झाला. आज मुख्यमंत्री वेगळ्याच रुपात दिसले. त्यांनी चक्क क्रिकेटचा आनंद लुटला. विशेष म्हणजे ते फटकेबाजी करताना दिसून आले. त्यांना टाकलेला प्रत्येक चेंडू त्यांनी हवेत उडविला. याही वयात त्यांनी क्रिकेटमध्ये आपण काही कमी नाही, हे दाखवून दिलं. निमित्त होतं एका क्रिकेट (Cricket) स्पर्धेच्या कार्यक्रमाचं.
बॉलिंग टाकणारे बॉलिंग टाकत होते. आलेला चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवेत उडवत होते. एक ओव्हर त्यांना टाकण्यात आला. प्रत्येक चेंडू त्यांनी टोलविला. एकही चेंडू वाया घालविला नाही. त्यामुळं केवळ राजकीयच नव्हे तर क्रिकेटमध्येही ते चांगली टोलेबाजी करताना दिसून आले.
गिरगावातील बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्रमांक 218 ने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. गिरगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी आगामी सामन्यातील खेळाडूंना स्टेजवर बोलवत त्यांनी टॉसही उडवला. आधीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा यावेळी बक्षीस देऊन सन्मानही केला. खास शिवसैनिकांनी केलेल्या अग्रहाखातर थेट मैदानात उतरून मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
यावेळी गिरगावचा शाखा क्रमांक 218 चे शाखाप्रमुख ललित माधव, ठाण्यातील उपविभागप्रमुख अमित लोटलीकर आणि गणेश गोळे, राहुल पवार,राकेश साळवी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू उपस्थित होते.