BREAKING : ‘ठाकरे कुटुंबाविरोधातील याचिकेवरील सुनावणी 22 तारखेपर्यंत तहकूब’, कोर्टात काय-काय घडलं?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या याचिकेवरील सुनावणी आता 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या याचिकेवरील सुनावणी आता 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची याचिका राजमुद्रा प्रिंटींग प्रेसच्या संचालिका गौरी भिडे यांनी मुंबई हायकोर्टात केलीय. गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी संबंधित याचिका हायकोर्टात दाखल केली होती. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत संबंधित याचिकेतील आक्षेप अद्याप दूर केलेले नाहीत, असं ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं. पण दुसरीकडे रजिस्टार मागितलेल्या सर्व बाबींचे पालन केल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर कोर्टाने याचिकाकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय?
याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेत फौजदारी नियमांचे पालन करुन शपथपत्र दाखल केलेलं नाही. याचिकाकर्त्यांनी व्यक्तीश: योग्यता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही. याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या रजिस्ट्रारला भेटावं, अशी सूचना हायकोर्टाने याचिकाकर्त्यांनी दिली.
हायकोर्टाचा रजिस्टार याचिकाकर्त्यांशी बोलून केसचं प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे की नाही ते ठरवेल, असं हायकोर्ट म्हणालं.
“याचिका करण्यामागे कोणताही वैयक्तिक फायदा, खासगी हेतू नाही, असे विधान याचिका मेमोमध्ये असलं पाहिजे”, असं हायकोर्टाने नमूद केलं.
याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
प्रबोधन प्रकाश प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचं नेमकं स्त्रोत काय आहेत? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आलाय. कोरोना काळात ‘सामना’ वृत्तपत्राला इतका फायदा कसा झाला? असा देखील प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आलाय.
2020 ते 2022 या काळात सामना वृत्तपत्राचं टर्नओव्हर 42 कोटी इतकं होतं. यापैकी 11 कोटी रुपयांच्या नफ्यावर याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.